‘भिऊ नका, तुमच्या न्याय्य मागण्यांसाठीच्या लढय़ात मी तुमच्याबरोबर व तुमच्या पाठीशी आहे,’ अशी ग्वाही भाजपचे लोकसभेतील उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी कोळी समाजाच्या मेळाव्यात दिली. महाराष्ट्रात मधुकर पिचड यांना कोळी समाजाचे प्रमाणपत्र मिळत असेल तर इतर कोळी समाजाला ते का मिळत नाही, असा सवालही मुंडे यांनी केला.
आदिम विकास परिषदेच्या वतीने दयानंद सभागृहात महादेव कोळी समाजाचा मेळावा झाला. अध्यक्षस्थानी परिषदेचे अध्यक्ष अविनाश कोळी होते. भाजपचे आमदार सुधाकर भालेराव, संभाजी पाटील, गोिवद केंद्रे यांच्यासह कोळी समाजाचे गोिवद बोयणे, नामदेव आपेट, साईनाथ अभंगराव व सिद्धेश्वर कोळी या वेळी उपस्थित होते. दोन महिन्यांत आपल्या जातीचे पुरावे सादर करा, अन्यथा आपल्याला नोकरी गमवावी लागेल, असा अध्यादेश सरकारने महादेव कोळी समाजास बजावला आहे. पण राज्यातील एकाही महादेव कोळी समाजातील माणसाची शासकीय नोकरी जाणार नाही, याची मी हमी देतो. मी स्वत लक्ष घालेन, असे मुंडे यांनी स्पष्ट केले.
महादेव कोळी समाजाचा समावेश अनुसूचित जाती-जमातीत केला पाहिजे. तुमची मागणी योग्य आहे. मात्र, ती मान्य करण्यासाठीची वाट खडतर आहे. तुम्हाला चळवळ करावी लागेल. न्यायालयीन लढा द्यावा लागेल. संसदेत दोन तृतीयांश बहुमत असेल तरच एखाद्या जातीचा समावेश अनुसूचित जाती-जमातीत करता येऊ शकतो. या सर्व लढय़ात मी तुमच्यासोबत आहे. केंद्रात व राज्यात आपले सरकार येणार अशी स्थिती दिसत असल्यामुळेच मी या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे ठरवले. तुमच्या मागण्या लवकरच मान्य होण्यासाठीचा कालावधी जवळ आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
अविनाश कोळी यांनी १९५०पूर्वीचे जात वैधतेचे दाखले सरकारकडून मागितले जात आहेत, हा समाजावर मोठा अन्याय आहे. या साठी मुंडे यांनी न्याय मिळवून देण्यास प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
पाच तास उशीर!
मुंडे व कार्यक्रमास उशीर याचा संबंध जुनाच आहे. शनिवारी सकाळी १० वाजताचा मेळावा दुपारी ३ वाजता सुरू झाला. सभागृह मात्र खचाखच भरले होते. उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करीत मुंडे यांनी, १९४७पासून २०१४पर्यंत आपल्या समाजाला न्याय मिळावा, याची वाट पाहणारे माझ्यासाठी केवळ ४ तास वाट पाहणार नाहीत का? अशी टिप्पणी केली.