News Flash

मुख्यमंत्र्यांसमोर समर्थक नगरसेवकांकडून तक्रारींचा पाढा

कराड पालिकेतील सत्ताधारी आम्ही सुचविलेल्या विकासकामांकडे राजकीय हेतूने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात, आमच्या प्रभागात सुचवलेली कामे वेळेत होत नाहीत, मात्र सत्ताधाऱ्यांच्या वॉर्डमध्ये तत्काळ कामे केली जातात.

| June 19, 2013 01:56 am

 कराड पालिकेतील सत्ताधारी आम्ही सुचविलेल्या विकासकामांकडे राजकीय हेतूने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात, आमच्या प्रभागात सुचवलेली कामे वेळेत होत नाहीत, मात्र सत्ताधाऱ्यांच्या वॉर्डमध्ये तत्काळ कामे केली जातात, यासह तक्रारींची जंत्री पालिकेतील विरोधी गटातील नगरसेवकांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापुढे वाचली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्याच कार्यकर्ते-नगरसेवकांवर अन्याय होत असल्याच्या भावनेतून पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांना दुजाभाव न करण्याबरोबरच अन्य सूचना करून पालिकेला दिलेल्या निधीतून होणाऱ्या विकासकामांचा अहवाल सादर करण्यास फर्मावले.
आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घरच्या मैदानावरील मतदार, कार्यकर्ते व सेवाभावी संस्था संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला. या वेळी मुख्यमंत्र्यांचा कराड पालिकेतील गट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विरोधी आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून पालिकेतील सत्ताधारी आघाडी व पालिका प्रशासनावर दबाव आणण्याची संधी साधली. पालिकेतील विरोधी गटाचे ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, नगरसेविका व माजी नगराध्यक्ष शारदाताई जाधव, स्मिता हुलवान, महादेव पवार, बाळासाहेब यादव, श्रीकांत मुळे आदी नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पालिकेच्या विकासकामात सापत्न वागणूक मिळत असल्याची तक्रार ताकदीने मांडली. या वेळी त्यांनी प्रीतिसंगम बागेला ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण उद्यान नाव द्यायला सत्ताधारी विरोध करतात, सत्ताधारी आम्ही सांगितलेल्या विकासकामांकडे दुर्लक्ष करतात, आमच्या वॉर्डात सुचवलेली कामे वेळेत होत नाहीत, अगोदर कामे सत्ताधाऱ्यांच्या वॉर्डामध्ये होतात, आमच्या सूचनांचा आदर केला जात नाही अशा तक्रारींचा पाढा वाचला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पालिकेची स्वतंत्र बैठक दुपारी घेणार असल्याचे सांगितले. या वेळी युवा नेते आमदार जयकुमार गोरे, राहुल चव्हाण, प्रदीप जाधव उपस्थित होते.
सकाळच्या सत्रात समर्थक नगरसेवकांची गाऱ्हाणी ऐकून घेतल्यानंतर ठरल्याप्रमाणे दुपारी मुख्यमंत्र्यांनी संबंधित नगरसेवक, पालिकेच्या मुख्याधिकारी अमिता दगडे, अधिकारी एम. एच. पाटील, आर. डी. भालदार, ए. आर. पवार, विजय तेवरे, दिलीप दीक्षित यांच्यासमवेत बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना सर्वाना एकत्र घेऊन विकासकामे करावीत, त्यामध्ये दुजाभाव करू नये अशा सूचना दिल्या. पालिकेला देण्यात आलेल्या निधीतून होणाऱ्या विकासकामांचा अहवाल सादर करावा आणि नवीन कामांचे प्रस्ताव द्यावेत. मंजूर कामे वेळेत पूर्ण करावीत अशा सूचना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2013 1:56 am

Web Title: supporter corporators complaints to chief minister
टॅग : Chief Minister
Next Stories
1 श्रीरामपूरचे १२० यात्रेकरू उत्तराखंडात अडकले
2 युवकाच्या खूनप्रकरणी आईसह तिघांना अटक
3 सोलापूर जिल्हय़ात मृग नक्षत्राने पाठ फिरविली
Just Now!
X