आधी खिचडीमधील विनोदी ‘हंसा’ने प्रेक्षकांना पोट धरून हसवले. त्यानंतर ‘छनछन’मधील कठोर उमाबेनने गंभीर व्हायला लावले. नंतर रामलीलामधील समाजाची मुखिया धनकोर बाँने मनात दहशत निर्माण केली. आता सुप्रिया पाठक पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवायला सज्ज झाल्या आहेत.
सब टिव्हीच्या ‘तू मेरे अगल बगल है’ या कार्यक्रमांतून ‘गंगा मौसी’च्या भूमिकेतून सुप्रिया पाठक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘गंगा मौसी’बद्दल सांगताना त्या म्हणाल्या, ‘ही एक प्रेमळ मावशी आहे. आपल्या भाच्याला प्रत्येक संकटातून वाचवण्यासाठी ती धडपडत असते. त्यातून विनोदनिर्मिती होते.’ हंसाच्या भूमिकेतून प्रेक्षकांना खळखळून हसवल्यानंतर सुप्रिया पाठक यांनी उमाबेन, धनकोर बाँसारख्या गंभीर भूमिका केल्या. आता पुन्हा एकदा विनोदी भूमिकांकडे वळणे सोपे नाही. पण त्यांनी हे आव्हान पेलले. ‘मला वेगवेगळ्या भूमिका करायच्या आहेत. एका साच्यातील भूमिकांमध्ये अडकून पडायचे नव्हते. म्हणूनच हंसानंतर कठोर सासूची भूमिका मी साकारली. नंतर संजय भंसाळी माझ्याकडे धनकोर बाँची भूमिका घेऊन आले. ती नाही म्हणणे मी शक्यच नव्हते.’ मालिका आणि सिनेमानंतर आता सुप्रिया पाठक यांना रंगमंच साद घालत आहे. नाटक करण्याचा विचार खूप वर्षांपासून मनात होता. पण नाटकासाठी इतर सर्व कामे मागे ठेवावी लागतात. इतकी वर्ष मी मालिका आणि सिनेमांमध्ये व्यग्र होते. आता मात्र वेळ काढून एकतरी नाटक करायचं असं मी ठरवले आहे. त्यासाठी काही संहितांचे वाचनही चालू आहे, असे त्यांनी सांगितले.