उरण तालुक्यातील केगावच्या वनवटी या छोटय़ा गावातील शेतीत भाजीपाला करून त्याची विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आई व देविदास पाटील यांची कन्या सुप्रिया पाटील हिने रविवारी झालेल्या मुंबई अर्धमॅरेथॉनमध्ये उरणमधील सरावादरम्यान पायात काटा रुतून जखम झाली असतानाही जिद्दीने तिसरी येण्याचा मान मिळविला आहे. सुप्रियाला ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा असून तिला आर्थिक मदतीची गरज आहे.
सुप्रिया पाटीलने स्टँडर्ड चॉर्टर, बेंगलोर टक्ने, वडोदरा मॅरेथॉन, गोवा, अहमदाबाद, कोचीन, ठाणे व मुंबई अशा आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये भाग घेऊन आपली चुणूक दाखविली आहे. सुप्रियाने मुंबई मॅरेथॉनमध्ये पाच वेळा, तर ठाणे मॅरेथॉनमध्ये चार वेळा आपला सहभाग नोंदविला आहे.   स्पर्धेत मिळालेल्या पारितोषिकाच्या रकमेपेक्षा अधिक खर्च होत असल्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणेही कठीण असल्याचे मत तिने लोकसत्ताशी बोलताना व्यक्त केले आहे.  यापूर्वी सुप्रियाने अहमदाबाद मॅरेथॉन स्पर्धेत २१ किलोमीटरमध्ये सुवर्णपदक पटकावले होते; तर डीएनए मॅरेथॉनमध्ये दुसरी आली होती. सुप्रियाचे प्रशिक्षक दिलीप पाटील यांनी सुप्रियाने आणखी पुढे जाऊन उरण व भारताचे नाव मोठे करावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. एक खेळाडू म्हणून आपल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी नोकरी मिळावी, अशी माफक अपेक्षा सुप्रिया पाटीलने व्यक्त केली आहे.