गेल्या वर्षी पाऊस कमी पडला. धरणांमध्येही कमी पाणी साठले. त्यामुळे यंदा पाणीटंचाई निर्माण झाली. यापुढे पाण्याचा काटकसरीने वापर करणे, पावसाचा थेंब न् थेंब जमिनीत जिरवणे यांसारख्या उपाययोजनांचा अवलंब करावा लागणार आहे. राज्यात टंचाई स्थिती असली, तरी त्यावर सर्वाच्या सहकार्याने यशस्वी मात करण्यात येत आहे, असा विश्वास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
परभणी जिल्ह्यातील मानवत येथे तातडीच्या पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार सुरेश देशमुख होते. थोरात यांनी राज्यातील टंचाई स्थितीचा उल्लेख करुन पाण्याचे महत्त्व विशद केले. सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, जालना येथील टंचाई स्थिती, जनावरांच्या छावण्यांबाबत माहिती देऊन टंचाईच्या संकटावर सर्वाच्या सहकार्याने यशस्वी मात केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी डॉ. शालिग्राम वानखेडे यांनी जिल्ह्यात सुवर्णजयंती राजस्व अभियान यशस्वीपणे राबविले जात असल्याचे नमूद केले. महसूल प्रशासन लोकाभिमुख करणाऱ्या या अभियानाअंतर्गत ५००पेक्षा अधिक शेतरस्ते मोकळे करण्यात आले. नागरिकांना वेगवेगळ्या प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. गेल्या वर्षी ८० हजारांहून अधिक प्रमाणपत्रे विविध गावांमध्ये जाऊन वाटप करण्यात आली. ठराविक दिवशी जमिनींच्या फेरफार अदालती घेण्यात येत असल्याची त्यांनी माहिती दिली. जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात करण्यास १४१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. ग्रामीण भागात १६ टँकर, नगरपालिका हद्दीत २०, तर महापालिका क्षेत्रात १५ टँकरने पाणीपुरवठा सुरु  असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मानवत अर्बन बँकेच्या वतीने एक लाख रुपयांचा धनादेश मंत्री थोरात यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. माजी आमदार देशमुख, आमदार मीरा रेंगे, प्रा. मोहन बारहाते आदींची भाषणे झाली.