जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्यांनतर जुल महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण जाणवू नये तसेच विभागस्तरावरील नागरिकांना मिळणाऱ्या सुविधामध्ये गतिमानता यावी, यासाठी महापौर सागर नाईक आणि नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी आधिकाऱ्यांशी संवाद साधला.
गटारे-नालेसफाई झाली असली तरी पाऊस पडत असताना सर्व अधिकाऱ्यांनी आपआपल्या विभाग क्षेत्रात पाहणी करून येणाऱ्या अडचणीवर मात करावी अशा सूचना महापौरांनी स्वच्छता अधिकांऱ्याना दिल्या. विद्युत विभागांच्या अभियंत्याने आपआपल्या क्षेत्रात रात्री फिरून सर्व पथदिवे सुरू राहतील याची दक्षता घेऊन आवश्यक दुरुस्त्या तातडीने कराव्यात असे निर्देश देताना खड्डेविरहित रस्त्यांसाठी अंभियांत्रिकी विभागाने जागरूक राहावे, अशा सूचनादेखील केल्या. नागरी आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी यांनी रुग्णांवर उपचार करण्यासोबतच आपल्या विभागातील नागरिकांच्या आरोग्य परिस्थितीचा आढावा घ्यावा; जेणेकरून साथीचे आजारांवर वेळीच नियंत्रण आणता येईल असे निर्देश आयुक्तांनी दिले.
पालिका कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी शहरात कामानिमित्त फिरत असताना काही त्रुटी आढळून आल्यास संबधित विभागाच्या निदर्शनास आणून द्याव्यात, तसेच परस्पर समन्वयाने काम करावे असे निर्देशदेखील पालिका कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी दिले. विभाग अधिकारी व संबंधित अधिकारी, कर्मचारी वर्ग यांनी आपल्या प्रभागात फिरून कोणत्या प्रकारची समस्या उद्भवणार नाही यांची दक्षता घ्यावी. समस्या उद्भवल्यास पावसाळी काळातील नियुक्त पथकांच्या साहाय्याने त्वरित दूर कराव्यात असे आदेश यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आले. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी पालिकेच्या आपत्कालीन कक्षाच्या २७५६७०६०/६१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महापौर व आयुक्तांनी केले आहे.