येत्या पावसाळ्यात चंद्रपूर जिल्ह्य़ातील पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी सोमवारी प्रशासनाला दिले.
चंद्रपूर जिल्ह्य़ातील संभाव्य पूरस्थिती व उपाययोजनांचा विभागीय आयुक्तांनी त्यांच्या दालनात आढावा घेतला. वेस्टर्न कोल फिल्ड्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेशचंद्र गर्ग, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर तसेच ओमप्रकाश, एस. एस. मंडलिक व इतर अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. चंद्रपूर जिल्ह्य़ात वर्धा, इरई, वैनगंगा नदी किनाऱ्यावर ८६ पूरप्रवण गावे आहेत. पावसाळ्यापूर्वी आवश्यक ती उपाययोजना करून नागरिकांनी जीवित तसेच वित्तहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी. संबंधित विभागांनी आतापासूनच सतर्क राहावे, अशी सूचना अनुपकुमार यांनी केली.
जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर यांनी पूरस्थितीची कारणे, प्रशासनाची कार्यवाही आदी सचित्र माहिती सादर केली. गेल्यावर्षी पुराचे पाणी शहरात शिरल्याने बहुतांशी घरे पाण्यात बुडाली होती. नदीचे खोलीकरण, नदीतील गाळ काढणे आदी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. चंद्रपूरच नव्हे तर जिल्ह्य़ाला मोठय़ा प्रमाणात पुराचा फटका बसला होता. पूरपरिस्थिती उद््भवू नये, या दृष्टीने वेळीच उपाययोजना करण्याच्या सूचना त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. पूर नियंत्रण रेषेची मर्यादा नागरिकांनी पाळावी. त्यासाठी प्रशासनानेही प्रयत्न करायला हवेत. इरई धरणाचे पाणी सोडताना काळजी घेणे गरजेचे असून वेस्टर्न कोल फिल्ड्सनेसुद्धा योग्य ती उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे विभागीय आयुक्तांनी सांगितले.