मांढरदेव यात्रा काळात उद्भवणारे वाद मिटविण्याचे धोरण येथील प्रशासनाने घेतले आहे. यात्रा नियोजनाच्या दृष्टीने तहसीलदार व पोलीस निरीक्षकांनी मंदिर व यात्रा परिसराची पाहणी केली.
मांढरदेव येथील काळूबाईची यात्रा २७ व २८ जानेवारीला होत आहे. यासाठी नियोजनाच्या दृष्टीने यात्रा परिसर व मंदिर परसिराची पाहणी तहसीलदार सुनील चंदनशिवे व पोलीस निरीक्षक दयानंद डोमे यांनी केली. पोलीस बंदोबस्ताच्या दृष्टीने, सुरक्षा व्यवस्थेच्या रचनेसाठी मंदिर परिसर व यात्रा परिसराची पाहणी करण्यात आली. नुकत्याच झालेल्या यात्रा नियोजनाच्या बैठकीत वाईचे प्रांताधिकारी सूरज वाघमारे यांनी ही जबाबदारी तहसीलदारांवर सोपविली होती.
गोंजीरबाबा व मांगीरबाबा मंदिराच्या दर्शनासाठी यात्रा काळात होणारी अडचण लक्षात घेऊन या ठिकाणचा वाद मिटविण्याचे धोरण प्रशासनाने घेतले आहे. या परिसराला एकदम शिस्त लागणार नाही. स्थानिक विक्रेत्यांनीही यात्रा काळात सहकार्य करणे गरजेचे असल्याचे प्रशासनाचे मत आहे. यात्रा परिसरात यात्रा काळात प्रशासनाचा, ट्रस्टींचा व पोलिसांचा वाढता वावर हा नेहमीचाच वादाचा विषय होतो. त्यामुळे स्थानिक व मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांवर परिणाम होतो. त्यामुळे या काळात विश्वस्त, प्रशासन व ग्रामस्थ असे वाद होत असतात.
या शिवाय ट्रस्टने उभारलेल्या नियोजन दर्शन रांगेच्या बॅरीकेटींगमुळे गोंजीरबाबा व मांगीरबाबा या मंदिरात दर्शनासाठी भाविक पोहोचू शकत नाहीत. काळूबाईच्या सेवेकऱ्यांची मंदिरे काळूबाई मंदिरासमोरच असल्याने नेहमीच येथे ट्रस्ट व या मंदिराचे सेवेकरी यांच्यात वाद होत असतात. हे सर्व वाद-विवाद सामंजस्याने मिटविण्याचे धोरण प्रशासनाने घेतले आहे. तहसीलदार सुनील चंदनशिवे व पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी या परिसराची पाहणी केली. आता पुढील नियोजन सुरू झाले आहे. वरिष्ठांनी ही जबाबदारी दोघांवर सोपविली आहे.