पाणी टंचाईची समस्या गंभीर बनत चाललेल्या मालेगाव तालुक्यात नदीजोड कालव्यांच्या सर्वेक्षणाच्या तीन कामांना नुकतीच शासनाने मंजुरी दिली आहे. सर्वेक्षणाच्या या कामांना प्रत्यक्षात सुरूवातही झाली आहे. ही कामे पूर्णत्वास आली तर दुष्काळी भागातील पाणी टंचाईची समस्या दूर होण्यासाठी काही अंशी मदत होणार असल्याने सर्वेक्षण झाल्यानंतर या तिन्ही कामांना शासन पातळीवरून तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बागलाण तालुक्यातील हरणबारी धरणाचे पूरपाणी वेगवेगळ्या बंधाऱ्यांद्वारे मालेगाव तालुक्यातील दोन नद्यांमध्ये आणि एका तलावात टाकण्याची ही नियोजित कामे असून त्यांच्या सर्वेक्षणासाठी प्रशासनातर्फे सुमारे २४ लाखाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.वळवाडे बंधाऱ्याद्वारे टोकडे गावाजवळ कान्हेरी नदीत आणि वाघळे (तळवाडे धरण)बंधाऱ्यापासून कजवाडे गावाजवळ बोरी नदीत पूरपाणी टाकणे तसेच वळवाडे बंधाऱ्यातून उजव्या कालव्याद्वारे अजंग लघुपाटबंधारे तलावात पूरपाणी टाकणे अशी ही तीन कामे आहेत. गेल्या काही दिवसापासून पावसाचे प्रमाण कमी होऊ लागल्याने तालुक्यातील अनेक बंधारे व नदी-नाले पावसाळ्यातदेखील कोरडेठाक असतात.या पाश्र्वभूमीवर नदीजोड कालव्यांच्या या कामांच्या माध्यमातून पूरपाणी उपलब्ध झाले तर या नदीकाठांवरील गावांचा पाण्याचा प्रश्न सुटू शकेल. ही कामे मंजूर होण्याच्या द्दष्टिकोनातून गेल्या तीन-चार वर्षांपासून आमदार दादा भुसे हे प्रयत्नशील होते. त्यानुसार या कामांना अलीकडेच मंजुरी मिळाली आहे.