० तीन हात नाका येथील गर्दीचा अभ्यास होणार
० नितीन, कॅडबरी जंक्शनचे नव्याने सर्वेक्षण
० कोंडी सोडविण्यासाठी नवे पर्याय
० आरटीओ जवळच्या पादचारी पुलाचा प्रस्ताव गुंडाळला
ठाणे महापालिकेने उशिरा का होईना तीन हात नाका, नितीन कंपनी आणि कॅडबरी जंक्शन येथील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी सविस्तर सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला असून, या नव्या अभ्यासप्रक्रियेमुळे आर.टी.ओ. ऑफिससमोरून पूर्व द्रुतगती महामार्गावर उभारण्यात येणाऱ्या पादचारी पुलाचा प्रस्ताव गुंडाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आर.टी.ओ. ऑफिससमोरून पादचारी पुलाऐवजी भुयारी मार्ग उभारता येईल का, याचा अभ्यास केला जात असून भिवंडी रस्त्यावर बाळकूम येथील पादचारी पुलाचा प्रस्तावही रद्द करण्यात आला आहे.
अपुरी वाहनतळे, अरुंद रस्ते, वाढत्या वाहतुकीवर योग्य नियोजन करण्यात आलेले अपयश यामुळे ठाणे शहर गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीचे आगार बनले आहे. शहरातील अंतर्गत वाहतुकीसाठी वेगवेगळ्या पर्यायांवर सध्या विचार सुरू असला तरी ठाणेकरांच्या पदरात नेमके काय पडेल, याविषयी अजूनही संभ्रमाचे वातावरण आहे. रेल्वे स्थानक ते घोडबंदर मार्गावर एमएमआरडीएच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला मोनो रेल्वेचा आराखडाही सध्या खर्च वाढल्याने कागदावर राहण्याची चिन्हे दिसू लागली आहे. या पाश्र्वभूमीवर ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडूल बाजूस दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कसा मार्ग काढायचा, असा प्रश्न महापालिका तसेच वाहतूक पोलिसांना पडला आहे. ठाणे रेल्वे स्थानकातून घोडबंदर तसेच पश्चिमेकडे जाणाऱ्या प्रवाशांना वाहतुकीचा नवा पर्याय म्हणून लाइट रेल ट्रान्सपोर्ट (एलआरटी) सुविधा उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. या प्रकल्पाच्या सुसाध्यतेवर लवकरच अभ्यासही केला जाणार आहे. असे असले तरी पूर्व द्रुतगती महामार्गावर ठाणे शहरास लागून असलेल्या भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर मार्ग कसा काढायचा, असा प्रश्न सध्या महापालिकेस पडला आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावर ठाण्याकडील बाजूस तीन उड्डाणपूल उभारण्यात आले असले तरी या उड्डाणपुलांखालील बाजूस असलेल्या जंक्शनवर मोठय़ा प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र दिसत आहे. तीन हात नाका परिसरावर गेल्या काही वर्षांत वाहतुकीचा मोठा भार पडू लागला असून सध्या अस्तित्वात असलेली येथील सिग्नल यंत्रणा कुचकामी ठरते की काय, अशी भीती आता नियोजनकर्त्यांना वाटू लागली आहे. याशिवाय नितीन कंपनी जंक्शन भागात वाहतूक कोंडी नित्याची बनली असून या भागात सिग्नल यंत्रणेच्या अंमलबजावणीविषयी वाहतूक पोलीसही फारसे गांभीर असल्याचे चित्र नाही. त्यामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावरील या तीन जंक्शनवरील वाहतूक व्यवस्थेचा नव्याने अभ्यास करण्याचा निर्णय महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने घेतला आहे. तीन हात नाका, नीतीन कंपनी तसेच कॅडबरी जंक्शन भागाचे सविस्तर सर्वेक्षण केले जाणार आहे. याशिवाय या भागातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी नव्या पर्यायांची तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती अभियांत्रिकी विभागातील उच्चस्तरीय सूत्रांनी ‘वृत्तान्त’ला दिली. पश्चिमेकडे लुईसवाडीनजीक असलेल्या सव्‍‌र्हिस रोड येथील आरटीओ कार्यालयापासून द्रुतगती महामार्ग ओलांडता येण्यासाठी पादचारी पूल उभारण्याची योजना सुरुवातीस महापालिकेने आखली होती. मात्र नव्याने होणाऱ्या या सर्वेक्षणामुळे हा पादचारी पूल उभारायचा नाही, असा निर्णय अभियांत्रिकी विभागाने घेतला असून याठिकाणी भुयारी मार्गाची उभारणी करता येईल का, याची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.
बाळकूमचा पादचारी पूलही गुंडाळला
भिवंडी रस्त्यावर बाळकूम भागात पादचारी पुलाच्या उभारणीचा प्रस्तावही गुंडाळण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या भागातील भौमितिक रचनेमुळे पादचारी पूल बांधल्यास जिन्याच्या उंचीत वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पादचारी पुलाऐवजी भुयारी पादचारी मार्ग उभारता येईल का, याचाही अभ्यास केला जात आहे.