सूर्यचूल तयार करून त्यावर शिजविलेल्या खिचडीवर प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी मनसोक्त ताव मारला. जालना जिल्ह्य़ाच्या १०१ शाळांमधील तब्बल २ हजार ४४ विद्यार्थ्यांनी शनिवारी अभूतपूर्व विक्रम साकारला. जगातला सर्वात मोठा सोलर कुकिंग क्लास ठरलेल्या ‘सूर्यकुंभ’ या वैज्ञानिक उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, पर्यावरण, समाजाप्रती जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न अशा प्रकारे यशस्वी ठरला. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्, तसेच लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसाठीची पात्रताही या उपक्रमाने साध्य केली.
स्वामी विवेकानंदांच्या १५०व्या जयंतीनिमित्ताने स्वामी विवेकानंद सार्ध शती समारोह समिती आणि ‘सिम्प्लिीफाइड टेक्नॉलॉजीज फॉर लाईफ’ यांच्या वतीने हा उपक्रम पार पडला. तरुण अभियंता विवेक काबरा यांच्या कल्पकतेतून, तसेच उद्योजक सुनीलकुमार रायठठ्ठा व सुनील गोयल यांच्या प्रयत्नातून जे.ई.एस. महाविद्यालयाच्या मैदानावर शालेय विद्यार्थ्यांकडून सोलर कुकर तयार करवून घेत त्यात खिचडी शिजविण्याचा हा उपक्रम सर्वानाच भावला.संयोजकांकडे १०७ शाळांमधून २ हजार १७१ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. पैकी १०१ शाळांमधील २ हजार ४४ विद्यार्थी यात प्रत्यक्ष सहभागी झाले. या सर्वाना सौरचूल तयार करण्याचे साहित्य मैदानावर प्रत्येक मुलासाठी आखण्यात आलेल्या चौकोनात ठेवले होते. सहभागी मुलांचे ५ गट करण्यात आले. गटांची नावेही आदित्य, भास्कर, ईशान, सारंग, विराज अशी सूर्याच्या नावावरून ठेवण्यात आली.सुरुवातीला मुलांना सोलर कुकर व त्यात काम करणारे तंत्र समजावून देण्यात आले. त्यानंतर प्रशिक्षकांच्या मदतीने सर्व मुलांनी सोलर कुकर तयार केले. ५० मिनिटांत तयार झालेल्या कुकरमध्ये भिजलेल्या साबुदाण्यासह सर्व मिश्रण ठेवण्यात आले नि मुले परत मंडपात आली. मान्यवरांच्या भाषणांच्या तासाभराच्या कार्यक्रमानंतर मुलांना पुन्हा त्यांनी केलेल्या सोलर कुकरजवळ नेण्यात आले. मुख्य प्रशिक्षकांच्या सूचनेनंतर मुलांनी आपण तयार केलेले कुकर उघडून पाहिले असता आत पूर्ण शिजलेली चविष्ट खिचडी तयार झाली होती. आपणच तयार केलेल्या सोलर कुकरमधील खिचडीवर मुलांनी मनसोक्त ताव मारला. मुलांबरोबर शिक्षक व प्रेक्षकांनीही खिचडीचा आस्वाद घेतला. या उपक्रमात ४५ पर्यवेक्षक, २०५ प्रशिक्षक व १०८ कार्यकर्त्यांनी मुलांना मदत केली. ‘जगातील सर्वात मोठा सोलर कुकिंग क्लास’ अशी या उपक्रमाची नोंद या वेळी उपस्थित सात साक्षीदार आणि तज्ज्ञांनी केली.
या वैज्ञानिक उपक्रमाची गिनीज व लिम्का बुकमध्ये नोंदणी व्हावी, या दृष्टीने सर्व तांत्रिक बाबींची सतीश तवरावाला, रवी कोंका, प्रताप जगताप, डॉ. एच. के. पोपळघट, सागर कौना, दर्शन जैन व राहुल भाले यांनी नोंद केली.या उपक्रमाच्या नोंदणीसाठीचे सर्व निकष पूर्ण झाले असल्याचा निर्वाळा परीक्षकांनी दिला.