साहित्य, शिक्षण, कला, पत्रकारिता आदी क्षेत्रात उल्लेखनीय सेवेसाठी सोलापूरच्या सुशील सोशल फोरमतर्फे दिल्या जाणाऱ्या सुशीलकुमार शिंदे पुरस्कारासाठी यंदा प्रा. डॉ. श्रीनिवास खांदेवाले (नागपूर), प्रा. प्रज्ञा पवार (ठाणे) व ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर यांना जाहीर झाला आहे. येत्या मंगळवारी, ३ सप्टेंबर रोजी या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
    प्रत्येकी ११ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सुशील सोशल फोरमचे अध्यक्ष, माजी महापौर अ‍ॅड. यू.एन.बेरिया यांनी या पुरस्कारांची घोषणा पत्रकार परिषदेत केली. डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात मंगळवारी सायंकाळी ४.३० वाजता काँग्रेसचे राष्ट्रीय चिटणीस अनिस अहमद यांच्या हस्ते व महापौर अल्का राठोड यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी आमदार प्रणिती िशदे, आमदार दिलीप माने व काँग्रेसचे स्थानिक नेते विष्णुपंत कोठे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. पुरस्कार निवड समितीवर पुणे विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.यशवंत सुमंत, प्रा. एफ.एच.बेन्नूर व प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी काम पाहिले.
    साहित्य, कला, शिक्षण, पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय सेवा करणाऱ्या महनीय व्यक्तींना गेल्या आठ वर्षांपासून सुशीलकुमार शिंदे पुरस्कार दिले जातात. डॉ. जर्नादन वाघमारे, डॉ. यशवंत मनोहर, जावेद आनंद, डॉ. सूर्यनारायण रणसुभे, शफाअत खान, अभिजित घोरपडे, प्रताप आसबे, डॉ. शरणकुमार िलबाळे आदींना या पुरस्काराने यापूर्वी सन्मानित करण्यात आले आहे. यंदाच्या पुरस्काराचे मानकरी प्रा.डॉ.श्रीनिवास विष्णू खांदेवाले यांनी नागपूर विद्यापीठात ३५ वष्रे सेवा केली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली १६ जणांनी पीएच.डी. तर ३० जणांनी एम.फील. केले आहे. त्यांनी गेल्या ५० वर्षांपासून विविध वृत्तपत्रातून विविध विषयांवर लेखन केले आहे तर पुरस्कारांचे मानकरी प्रा. प्रज्ञा पवार यांनी विपूल साहित्य लेखन केले आहे. यमाजी मालकर यांनी २६ वर्षांपासून पत्रकारितेत उल्लेखनीय सेवा केली आहे.