आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सोलापूरचे खासदार तथा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मागील महिन्यापासून सोलापूर मतदारसंघातील संपर्क वाढविला असून, या माध्यमातून त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केल्याचे मानले जात आहे. शिंदे यांनी नुकतेच सलग चार दिवस सोलापुरात तळ ठोकला. या भेटीत त्यांनी सहकुटुंब ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेसह मकरसंक्रांत व पैगंबर जयंती उत्सवात सहभागी होऊन आनंद लुटला. विशेषत: उर्दू मुशायरा व कव्वाली मैफलीत सहभागी होताना रसिकतेचेही दर्शन घडविले.
ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेत सहभागी होण्याचा शिरस्ता शिंदे कुटुंबीयांनी अनेक वर्षांपासून कायम ठेवला आहे. यंदा सिद्धेश्वर यात्रेसह मकरसंक्रांत व मुहम्मद पैगंबर जयंती उत्सव एकत्र आल्याचे औचित्य साधून शिंदे यांनी आपला राजशिष्टाचार काहीसा बाजूला ठेवून या सर्व उत्सवांमध्ये सहभाग घेतला. विशेषत: पैगंबर जयंतीनिमित्त आयोजिलेल्या किमान पाच कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली.
पैगंबर जयंतीच्या पूर्वसंध्येला सुशीलकुमार उर्दू लायब्ररीने शिवछत्रपती रंगभवनात आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील उर्दू मुशायरा कार्यक्रमात बराच वेळ शिंदे यांनी हजेरी लावून मुशायऱ्याला दाद दिली. विजापूर वेशीत जश्न-ए-मिलादुन्नबी जुलूस कमिटीने आयोजिलेल्या शोभायात्रेचा शुभारंभ शिंदे यांनी आपल्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना सोबत घेऊन केला. त्यानंतर रात्री आसार शरीफ येथे आयोजिलेल्या सुलतान नाझा (मुंबई) यांच्या कव्वाली मैफलीत त्यांनी काही वेळ हजेरी लावली. त्या पाठोपाठ बारा इमाम चौकात आयोजित कव्वालीच्या जंगी मुकाबल्यातही शिंदे हे बराच वेळ रममाण झाले होते. पैगंबर जयंतीनिमित्त राज्य शासनानेही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिप्रदूषणविरोधी कायदा शिथिल केल्याने कव्वालीच्या मैफलींना रंग चढला होता. यात स्वत: सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांच्या सहभागामुळे या मैफली गाजल्या व तेवढय़ाच संस्मरणीय ठरल्या. परवीन शहजादी (मुंबई) व शाकीर व झाकीर चिश्ती (औरंगाबाद) यांच्या कव्वालीच्या जंगी मुकाबल्यात शिंदे यांनी कव्वाल मंडळींचे भरभरून कौतुक करीत त्यांचा सत्कारही केला.
आगामी लोकसभा निवडणुकीस हक्काच्या सोलापूर मतदारसंघातून आपण उभे राहणार असल्याचे संकेत शिंदे यांनी यापूर्वीच दिले असून, आपल्या विरोधात कोणीही उभा राहिला तरी त्याची आपणास काळजी वाटत नाही, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. सोलापूरमधील अल्पसंख्याक समाजातील पाच तरुणांना १५ दिवसांपूर्वी मध्य प्रदेशच्या एटीएस पथकाने दहशतवादी कारवायांप्रकरणी संशयित म्हणून अटक केली आहे. त्याविषयी स्थानिक अल्पसंख्याक समाजात पसरलेल्या नाराजीच्या मुद्यावर शिंदे यांनी अल्पसंख्याक समाजाशी संपर्क वाढवण्यावर विशेष भर दिल्याचे बोलले जात आहे. गेल्या महिन्यापासून शिंदे हे सलग तीन-चार वेळा सोलापुरात येऊन तीन-तीन दिवस तळ ठोकत आहेत. अक्कलकोट व दक्षिण सोलापुरात सीमा सुरक्षा बल व सशस्त्र सीमा सुरक्षा बलाचे प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन व अन्य विकासकामांच्या शुभारंभासह शिंदे हे विविध समाजघटकांच्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत.