नेहमीप्रमाणे सकाळी कामावर हजर झालेल्या पोलीस अधिकाऱ्याने चौकीतच रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून घेत आत्महत्या केल्यामुळे पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. उपनगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या दसक चौकीत सकाळी पावणे दहा वाजता ही घटना घडली. महत्वाची बाब म्हणजे, संबंधित अधिकाऱ्याच्या मुलीसमोर हा प्रकार घडला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी घरगुती वादातून हा प्रकार घडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर असणाऱ्या कामाच्या ताणाचा मुद्दाही या निमित्ताने चर्चेत आला आहे.
जगन्नाथ खंडू सोनवणे (५७) असे या अधिकाऱ्याचे नांव आहे. उपनिरीक्षकपदी कार्यरत सोनवणे उपनगर ठाण्यांतर्गत दसक  चौकीचा कारभार पाहात होते. जेलरोड परिसरातील कलानगरमध्ये वास्तव्यास असणारे सोनवणे हे बुधवारी सकाळपासून काहिसे अस्वस्थ वाटत होते, असे सांगण्यात येते. त्यामुळेच त्यांनी आपली मुलगी प्रणालीला दुचाकीवरून चौकीत सोडण्यास सांगितले होते. साधारणत: सकाळी साडे नऊच्या सुमारास प्रणाली वडिलांना घेऊन चौकीत आली. वडिलांची अस्वस्थता पाहून ती चौकीतून जाण्यास तयार नव्हती. सोनवणे यांनी तिला घरी जाण्यास सांगितले असता तिने नकार दिला. त्यानंतर त्यांनी प्रणालीला पिण्यासाठी पाणी आणण्यास सांगितले. पाणी आणण्यासाठी तिची पाठ वळते न वळते तोच आपल्या सव्र्हिस रिव्हॉल्व्हरमधून सोनवणे यांनी स्वत:वर गोळी झाडली. अगदी क्षणार्धात घडलेल्या या प्रकाराने प्रणाली हादरली. गोळीबाराचा आवाज ऐकून बाहेर थांबलेल्या दोघा गृहरक्षकांनी चौकीत धाव घेतली. प्रणालीने त्यांच्या मदतीने गंभीर जखमी वडिलांना लगेचच जवळच्या एका खासगी रुग्णालयात नेले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यानच्या काळात या घटनेची माहिती सर्वत्र पसरली. उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी, उपनगर ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब बुधवंत व आयुक्तालयातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. गोळीबाराच्या घटनेमुळे दसक  चौकीतील त्यांचे सर्वच सहकारी हादरले होते. सोनवणे आत्महत्येच्या निर्णयाप्रत का आले, याची माहिती घेण्याचा प्रयत्न पोलीस अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. तीन ते चार वर्षांपासून ते उपनगर ठाण्यात कार्यरत होते. काही महिन्यांसाठी त्यांची जमादार पदावरून उपनिरीक्षक पदावर बढती झाली होती. निवृत्तीस अतिशय कमी कालावधी बाकी असताना त्यांनी आत्महत्या का केली, याचे सर्वानाच गूढ आहे. या घटनेस काही घरगुती वाद कारणीभूत आहे का, या दृष्टिकोनातून पोलीस तपास करत आहेत.
या संदर्भात कुटुंबियांकडून अद्याप काही माहिती मिळविणे शक्य झाले नसल्याने या घटनेचे कारण स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, चौकीत अशा पध्दतीने आत्महत्या केल्याची शहरातील ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जाते. आठ ते दहा वर्षांपूर्वी आडगाव येथील ग्रामीण पोलीस मुख्यालयात अंतर्गत वादातून पोलीस कर्मचाऱ्याने अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या होत्या. अधिकारी वा कर्मचाऱ्यांनी गळफास घेऊन वा विषप्राशन करून आत्महत्या केल्याचे काही प्रकार यापूर्वी घडल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.