कोथरूडमधील बिल्डरवरील गोळीबार प्रकरण
कोथरूड येथील बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर खंडणीसाठी गोळीबार केल्याच्या आरोपावरून अटक केलेला सराईत गुन्हेगार लक्ष्मण जाधवच्या भावाच्या विरुद्ध वेळेत आरोपपत्र दाखल न केल्यामुळे न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. याप्रकरणी तपास अधिकाऱ्याला न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस काढली आहे.
गोकुळ अण्णा जाधव (वय ३२, रा. बोरी पारधी, केडगाव) असे जामीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्य़ात गोकुळ याला १५ ऑक्टोंबर रोजी अटक करण्यात आली होती. कोथरूड येथील बांधकाम
व्यावसायिक शेषाराम चौधरी (वय ५५, रा. कोथरूड)यांच्या घरावर २७ सप्टेंबर २०१२ रोजी रात्री नऊच्या सुमारास दोन व्यक्तींनी गोळीबार केला होता. शेषाराम यांना लक्ष्मण जाधव याने पन्नास लाख रूपयांची खंडणी मागितली होती. ती न दिल्यामुळे चौधरी यांच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणात गोकुळ याला अटक
केली होती व त्याचा भाऊ लक्ष्मण जाधवचा पोलीस कसून तपास करत आहेत.
या गुन्ह्य़ात आरोपीला अटक करून नव्वद
दिवस झाले तरी त्याच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले नसल्यामुळे आरोपीचे वकील अॅड. सुचित मुंदडा आणि पोपट पाटील यांनी जामिनासाठी अर्ज केला. आरोपपत्र दाखल झाले नसल्यामुळे न्यायालयाने त्याला पन्नास हजाराचा जामीन मंजूर केला. मात्र, आरोपीच्या विरुद्ध आरोपपत्र का दाखल केले नाही, म्हणून कोथरूड पोलीस ठाण्याच्या तपास अधिकाऱ्याविरुद्ध कारणे दाखवा नोटीस बाजवली आहे.