ऐरोली सेक्टर ३ मधील श्रीराम विद्यालयाच्या १७ कंत्राटी शिक्षकांना कामावरून निलंबित करण्यात आल्याने या शिक्षकांनी शुक्रवारी कामगार दिनाच्या दिवशी श्रीराम विद्यालयासमोर ठिय्या मांडला होता. पालकही या आंदोलनात सहभागी झाले होते. या शिक्षकांच्या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने शिक्षकांची माफी मागितली व या शिक्षकांना संस्थेच्या सरस्वती विद्यालयात सामावून घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
श्रीराम शिक्षण संस्थेच्या श्रीराम विद्यालयामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये कंत्राटी शिक्षकांची पगारवाढ थकवल्याने पालक संघटना व शिक्षकांनी शाळा प्रशासनाविरोधात विद्यार्थीची रॅली, आंदोलन केले होते. त्यामुळे  पालक संघटना व राजकीय नेत्यांच्या मध्यस्थीमुळे शाळा प्रशासनाने शिक्षकांची थकलेली अंतरिम पगारवाढ देण्याचा प्रश्न मिटवला होता. परंतु शाळा प्रशासनाने स्मार्ट क्लास बंद केल्यामुळे क्लासच्या शिक्षकांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला होता. तसे दूरध्वनीवरून शिक्षकांना सांगण्यात आल्याने कंत्राटी शिक्षकांना धक्का बसला. अचानकपणे कामावरून काढण्याचा निर्णय घेतल्याने शिक्षकांमध्ये असंतोष पसरला होता. त्यामुळे शिक्षक व पालक संघटनांनी शुक्रवारी शाळेसमोर ठिय्या मांडला. या आंदोलनाची दखल घेऊन संस्थेने नमते घेत श्रीराम विद्यालयामधील स्मार्ट क्लास बंद करण्यात आल्यामुळे शिक्षकांची संख्या जास्त होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. परंतु तो निर्णय मागे घेतला असून शिक्षकांना संस्थेच्या सरस्वती विद्यालयात भरती करण्यात येणार असल्याचे संस्थेचे व्यवस्थापक अभिराज सिंग यांनी सांगितले व झाल्या प्रकाराबद्दल त्यांनी शिक्षकांची माफी मागितली. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.