रोजीरोटी करून चरितार्थ चालविणाऱ्या दाम्पत्याचा पुणे येथे जाताना सोबत पाच मुलांना कसे न्यायचे, यावरून वाद झाला आणि या वादाचे शांत्यर्पण या दाम्पत्याने अत्यंत निर्दयतेने स्वत:च्या दोन चिमुरडय़ांचे जीव घेऊन केले. मोबाइलच्या माध्यमातून या खुनी दाम्पत्याचा माग घेण्यात पोलिसांना यश आले आणि समोर आलेले दाहक सत्य पचवताना पोलिसांचे हृदयही द्रवले. या दाम्पत्याला पुण्यातील खडकी परिसरातून पोलिसांनी अटक केली.
मोलमजुरी करून कसेबसे पोट भरणाऱ्या या खुनी दाम्पत्याचे पुणे येथे जात असताना ५ मुलांना सोबत कसे न्यावे, यावरून भांडण झाले. या भांडणातून पोटच्या दोन मुलांचा निर्दयतेने खून करून विहिरीत या चिमुकल्यांचे मृतदेह फेकून हे दाम्पत्य पुण्यास गेले होते. खुनी परसराम व त्याची पत्नी मीरा बेले या दोघांना खडकी येथून अटक करण्यात िहगोली पोलिसांना यश आले. पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे यांनी ही माहिती दिली.
औंढा नागनाथ तालुक्यातील आमदरी येथील बेले दाम्पत्य मजुरी करते. त्यांना ५ अपत्ये होती. हे दाम्पत्य कामानिमित्ताने बाहेरगावी असते. पुण्यास कामावर जाण्यासाठी म्हणून हे दोघे गेल्या शुक्रवारी ५ मुलांना सोबत घेऊन निघाले, मात्र मुलांना कसे न्यायचे यावरून पती-पत्नीत वाद झाला. या प्रकारानंतर दोन मुलांना माहेरी नेऊन सोडते, असे म्हणत तणतणत निघालेल्या मीराबाईने काही अंतरावर जाताच एकदम दोन चिमुकल्यांना दगडावर आपटून निर्दयतेने ठार केले आणि विहिरीत फेकून दिले. प्राथमिक तपासात आरोपीने ही कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. एक वर्षांचा मुलगा व तीन वर्षांची मुलगी या दोन चिमुकल्यांचा निर्दयी मातेने जीव घेतला.
खून केल्यानंतर दोन्ही चिमुकल्यांना लुगडय़ात गुंडाळून मृतदेह बोल्डा शिवारातील विहिरीत फेकून दिले व काही घडलेच नाही, अशा आविर्भावात हे दाम्पत्य उर्वरित तीन मुलांसह पुणे शहरातील खडकी भागात दिलीप कोठुळे यांच्या शेतावर जाऊन थांबले होते. मात्र, हा प्रकार उघडकीस आल्यावर तपासाच्या निमित्ताने गेलेल्या पोलिसांनी बेले याच्या मोबाइलचे टॉवर लोकेशन घेतले असता ते अकोळनेर येथे दाखवण्यात आले, त्यामुळे पोलीस पथकाने तेथील ऑइल डेपोत जाऊन चौकशी केली, मात्र हे दाम्पत्य तेथे सापडले नाही.
नंतर पोलिसांनी त्यांच्या नातेवाइकांना पोलीस ठाण्यात आणून त्यांचा मीराबाईसोबत संपर्क करून दिला. या वेळी मीराबाईने आम्ही खडकी येथे कोठुळे यांच्या शेतात कामाला असल्याचे पलीकडून बोलताना सांगितले. ही माहिती मिळताच मंगळवारी रात्री पोलीस पथक खडकीत धडकले व कोठुळे नावाच्या व्यक्तीचा शोध घेतला. या वेळी कोठुळे यांच्या शेतावर बेले दाम्पत्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. अधिक चौकशीत त्यांनी स्वत:च्याच दोन चिमुकल्यांचा खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
चिमुकल्यांच्या खुनातील आरोपींना अटक करण्याचे आव्हान िहगोली पोलिसांसमोर होते. पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख, उपअधीक्षक नीलेश मोरे, अशोक जोंधळे यांच्या पथकाने बोल्डा शिवार िपजून काढले. आरोपी पुणे परिसरात असल्याचे संकेत मिळताच पथक पुणे परिसरात पोहोचले. अखेर खुनानंतर चौथ्या दिवशी आरोपी बेले पती-पत्नीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.
दरम्यान, यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक दाभाडे यांनी या पथकाला पारितोषिक जाहीर केले आहे.