पश्चिम महाराष्ट्रातील ऊस दरवाढीसाठी सुरू असलेल्या आक्रमक आंदोलनाप्रमाणेच विदर्भ व बुलढाणा जिल्ह्य़ात शेतकऱ्यांचे रोखीचे पीक असलेल्या कापूस व सोयाबीनच्या भाववाढीचे आंदोलन पेटविणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी येथे एका पत्रकार परिषदेत दिली.
सोयाबीनला प्रती क्विंटल पाच हजार रुपये व कापसाला प्रती क्विंटल आठ हजार रुपये भाव मिळावा, या प्रमुख मागण्यांसह शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना उद्यापासून बुलढाणा जिल्हा निर्धार पदयात्रा काढणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या पदयात्रेचा महात्मा फुले स्मृतीदिनी ३० नोव्हेंबरला संतनगरी शेगाव येथून प्रारंभ होईल. २५० कि.मी.च्या या निर्धार पदयात्रेत खामगाव, अटाळी, लाखनवाडा, चिंचपूर, तोरणवाडा, उंद्री, अमडापूर, मंगरूळ नवघरे, दहिगाव, पेठ, दिवठाणा, चिखली, हातणी, रायपूर, सैलानी, भडगाव,  धाड दुधा, चिखला, कोलवड येथे जाहीर सभा होतील. आठ दिवस चालणाऱ्या या पदयात्रेचा ९ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य शेतकरी मोर्चा काढून समारोप करण्यात येईल. या मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, शेतकरी नेते गजानन अमदाबादकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील.  
 शेतकऱ्यांच्या सोयाबीन व कापूस या पिकाला योग्य भाव देण्यात केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरत आहे. यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन व कापसाचे उत्पादन अतिशय घटले आहे. उत्पादनात घट व बाजारात भाव नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीच्या विळख्यात सापडला आहे. त्यामुळे भाववाढ व नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे. मात्र, निष्ठूर राज्य शासन याकडे  पाहण्यास तयार नसल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ही पदयात्रा असल्याचे तुपकर म्हणाले. कृ षिपंपाचे वीज कनेक्शन तोडू नका, जिल्हा बॅंकेंचे चाचणी अंकेक्षण करून दोषी संचालकांवर गुन्हे दाखल करा, सिलिंग कायदा रद्द करा, सावकारग्रस्त शेतकऱ्यांना जमिनी परत करा, अशाही पदयात्रेत मागण्या केल्या जाणार आहेत. ही पदयात्रा किमान १०० गावे, वस्त्या व वाडय़ांना भेट देईल. यात्रेचा नऊ ठिकाणी मुक्काम राहील. यात्रेत वाहनांचा कमीत कमी वापर केला जाईल, असे तुपकर यांनी सांगितले.