शेतकऱ्यांवर वेळोवेळी अमानुष अन्याय करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या या निर्लज्ज शासनाची झोप उडवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २८ ऑक्टोबरला सोयाबीन व कापसाला हमी भाव मिळावा, यासाठी लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले, तर त्याच मागण्यांसाठी जळगाव जामोद येथे भीक मांगो व खामगाव येथे वीज बिलांची होळी करण्यात आली.
गेल्या वर्षी दुष्काळ असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. यावर्षीही अतिपावसामुळे सोयाबीन पूर्णत: उद्ध्वस्त झाले असून शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यातच शेतकरी व शेती अजिबात जगणार नाही, याची सुपारीच जणू या शासनाने घेतली असून जे काय सोयाबीन शेतकऱ्यांच्या पदरी पडले आहे त्याचे भाव या शासनाने पद्धतशीरपणे पाडले. म्हणून या शेतकरीविरोधी शासनाच्या निषेध म्हणून स्वाभिमानीने सोयाबीनला किमान ५००० रुपये व कापसाला किमान ८००० रुपये हमी भाव, तसेच यावर्षी जिल्ह्य़ात अतिवृष्टी होऊन जवळपास ६०० हेक्टर जमीन खरडून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्या नुकसानभरपाईपोटी हेक्टरी २५,००० रुपये सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात यावे व विद्युत वितरण कंपनीने जो कृषिपंपांचा वीज तोडणीचा सपाटा लावला आहे तो तात्काळ थांबवून शेतकऱ्यांना पूर्ण वेळ वीजपुरवठा करण्यात यावा, तसेच जिल्हा बँकेतील बिगर शेती कर्जाचे टेस्ट ऑडिट होऊन ते जनतेसमोर आणावे. या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करून या शेतकऱ्यांप्रती उदासीन असलेल्या शासनाला जाग यावी म्हणून शेकडो शेतकऱ्यांसह शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे लाक्षणिक धरणे देण्यात आले. हे धरणे नसून शासनाला या आंदोलनाच्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा व जिल्ह्य़ातील संबंध शेतकऱ्यांचा खणखणीत इशारा आहे.
या मागण्यांचा तात्काळ विचार जर झाला नाही तर येणारे आंदोलन रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यावरच जिल्ह्य़ातील शेतकरी दिवाळी साजरी करतील, असा इशारा अ‍ॅड.शर्वरी तुपकर यांनी दिला व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन देऊन या धरणे आंदोलनाचा समारोप करण्यात आला. यावेळी डॉ. जनार्दन शिवनेकर, बबनराव चेके, सतीश अण्णा उबाळे, राणा चंद्रशेखर चंदन, लखन गाडेकर यांची भाषणे झाली. या आंदोलनात जिल्हाभरातून शेतकरी व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.