जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या करीत असताना दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी संवेदनशील क्षेत्रात मद्यपानासह पार्टी करण्यात मग्न असल्याचा निषेध करीत सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या कारणांनी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या या विभागाच्या कार्यालयाचे गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केले. या अनोख्या आंदोलनात संघटनेने शाहिरांचे कलापथक सहभागी करीत या विभागाच्या कारनाम्यांवर आधारित गाणीही सादर केली.
बांधकाम विभागातील मुख्य अभियंत्याच्या सेवानिवृत्तीनिमित्त काही दिवसांपूर्वी कंत्राटदाराने थेट ओझर विमानतळावर सामिष पार्टीचे आयोजन केले होते. मध्यरात्री उशिरापर्यंत चाललेल्या पार्टीत बांधकाम विभागातील अनेक अधिकारी सहभागी झाल्याचे सांगितले जाते. लढाऊ विमानांची बांधणी होणाऱ्या एचएएलच्या अखत्यारीतील विमानतळावर या पद्धतीने पार्टीचे आयोजन करून सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. या प्रकरणी जानोरी ग्रामस्थ, खासदार व राजकीय पक्षांनी ओरड केल्यावर अखेर पार्टीचे आयोजन करणारे कंत्राटदार विलास बिरारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात अद्याप पार्टीत सहभागी झालेल्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली नाही. या अधिकाऱ्यांची कार्यशैली पैशांचा मस्तवालपणा दर्शवीत असल्याचा आरोप संघटनेचे जिल्हा प्रवक्ते हंसराज वडघुले यांनी केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सकाळी बारा वाजता त्र्यंबक रस्त्यावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात धडक मारली. हाती भला मोठा फलक आणि सोबत शाहिरांचे कलापथक घेऊन पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.
मागील काही वर्षांपासून बांधकाम विभाग सातत्याने वादाच्या भोवऱ्यात आहे. दुष्काळ आणि व्यवस्थेतील त्रुटींमुळे शेतकरी आत्महत्या करीत आहे. दुसरीकडे चिखलीकर समोर येत आहेत. या विभागातील अभियंता चिखलीकरकडे कोटय़वधींची बेहिशेबी मालमत्ता सापडली होती. या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली. पण पुढे ती बासनात गुंडाळून ठेवण्यात आली. चिखलीकर प्रकरण ताजे असताना विमानतळासारख्या संवेदनशील ठिकाणी शासकीय जागेत शेकडो अधिकाऱ्यांनी गोंधळ घातल्याची तक्रार आंदोलकांनी केली. या विभागात ‘प्रभारी’ या गोंडस नावाखाली आर्थिक व्यवहार करून खुच्र्या उबविण्याचे प्रमाण मोठे आहे. पार्टीच्या प्रकरणात एका कंत्राटदारावर कारवाई करून चिखलीकरण समितीसारखा हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. अधिकारी आणि त्यांचे राजकीय आश्रयदाते अद्याप मोकाट आहेत. नव्या भाजप-सेना युती सरकारकडून स्वच्छ प्रशासन आणि न्यायाची अपेक्षा असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
जनतेच्या पैशांची लूट करीत करीत कंत्राटदारांशी संगनमत करणारे ‘व्हाइट कॉलर’ अधिकारी आणि त्यांच्या राजकीय आश्रयदात्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. या वेळी कलापथकाने अधिकाऱ्यांची कार्यशैली अधोरेखित करणारी गाणी सादर केली. अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीमुळे कार्यालयाचे पावित्र्य भंग पावले आहे. यामुळे कार्यकर्त्यांनी कार्यालयात ठिकठिकाणी गोमूत्र शिंपडत शुद्धीकरण केले. विमानतळावरील पार्टीत सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. आपल्या मागणीचे निवेदन आंदोलकांनी बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. अचानक झालेल्या आंदोलनामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. कलापथकाने अनोख्या धाटणीने गाणी सादर करीत सर्वाचे लक्ष वेधून घेतले.