गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असताना शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. याचा धिक्कार करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निफाड प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
निफाड बाजार समितीपासून स्वाभिमानी शेतकरी युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, जिल्हा प्रवक्ते हंसराज वडघुले उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दीपक पगार, जिल्हाध्यक्ष गोविंद पगार आदींच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरूवात झाली. गारपीटग्रस्त व अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे कर्ज व वीज देयक माफ करावे, मध्यम मुदतीच्या पीक आणेवारी पद्धतीत सुधारणा करावी, अशा घोषणा मोर्चेकरी देत होते. मोर्चा प्रांत कार्यालयाजवळ आल्यानंतर जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. पोलिसांनी मोर्चा अडविल्यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी तुपकर यांनी गांधीजींच्या शांततामय मार्गानुसार आज मोर्चा काढण्यात आला असला तरी शासनाची मदत शेतकऱ्यांपर्यंत न पोहचल्यास भगतसिंगाच्या मार्गाने मोर्चा काढण्याचा इशारा दिला. वडघुले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गारपीठग्रस्तांना स्वतंत्र मदत जाहीर करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यासंदर्भात अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद न केल्याने संताप व्यक्त केला. यावेळी गोविंद पगार, दीपक पगार यांचीही भाषणे झाली. मोर्चेकरांच्या वतीने नायब तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
आगामी काळात मागण्या मान्य न झाल्यास स्वाभिमानी संघटना जिल्हाभर आंदोलन करेल, असा इशारा दिला. निवेदन देताना बाबा गोडसे, श्रावण देवरे, धनंजय जाधव, बशिर शेख आदी उपस्थित होते.