सूर आणि स्वरांसाठी भाषेची बंधने गळून पडतात आणि रसिकांना त्याचा निखळ आनंद घेता येतो, याची अनुभूती गुरुवारी वरळी येथे नेहरू सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आगळ्या मैफलीतून उपस्थितांना मिळाली. निमित्त होते ‘लोकसत्ता’ प्रस्तुत आणि स्वरप्रभा ट्रस्टने आयोजित केलेल्या तीन दिवसांच्या स्वरांजली महोत्सवाचे. महोत्सवाच्या पहिल्या दिवसाच्या सत्राची सांगता तबला, व्हायोलिन, खंजिरा आणि बासरीच्या अनोख्या जुगलबंदीने झाली.
या जुगलबंदीला शब्दांची साथ नसली तरीही वाद्यातून उमटणारे सूर आणि स्वर इतके चपखल आणि अचूक होते की शब्दांशिवाय असलेल्या या मैफलीने रसिक मंत्रमुग्ध झाले. कुमरेश यांचे व्हायोलिन, आदित्य कल्याणपूर यांचा तबला, सेल्वा गणेश यांचा खंजिरा आणि पं. रोणू मुजुमदार यांची बासरी यांचा मेळ असा काही जमून आला की प्रत्येक वेळी रसिकांनी अगदी उत्स्फूर्तपणे आणि काहीही हातचे न राखता टाळ्यांच्या कडकडाटात आपली दाद दिली.
अशा प्रकारची आगळी मैफल आपण मुंबईत पहिल्यांदा करत असल्याचे पं. रोणू मुजुमदार यांनी या वेळी सांगितले. चार वाद्यांच्या जुगलबंदीची ही चतुरंग मैफल म्हणजे एक मन आणि एक आत्मा यांचे मिलन असल्याचेही पं. मुजुमदार म्हणाले.
या आगळ्या जुगलबंदीची सुरुवात राग हंसध्वनीने झाली. पं. रोणू मुजुमदार यांच्या बासरीतून रागाचे विविध आविष्कार कधी हळूवारपणे तर कधी विजेच्या चपळाईने उलगडत गेले आणि त्यांना तितक्याच तोलाची साथ कुमरेश यांच्या व्हायोलिनची मिळाली. कधी कुमरेश व्हायोलिनवर सुरावट वाजवून सुरुवात करायचे आणि पं. मुजुमदार बासरीत श्वास फुंकून तो स्वर व सूर लीलया सादर करायचे. तर कधी पं. मुजुमदार बासरीतून जे सादर करायचे ते कुमरेश व्हायोलिनवर उमटवायचे.
पुढे या दोघांना आदित्य कल्याणपूर आणि सेल्वागणेश यांची साथ मिळाली. रंगलेल्या या जुगलबंदीत राग काफीही सादर करण्यात आला. बासरी आणि खंजिरा, तबला आणि व्हायोलिन, कधी बासरी आणि तबला असा प्रयोगही रंगला. आदित्य आणि सेल्वागणेश यांच्या तबला आणि खंजिरा जुगलबंदीलाही मोठी दाद मिळाली. आदित्य आणि सेल्वागणेश यांचा हात आणि बोटे अक्षरश: विजेच्या चपळाईन अशी काही फिरत होती की श्रोत्यांची स्थिती तबल्याकडे की खंजिराकडे बघू या, अशी झाली होती.
मैफलीची सांगता पुन्हा एकदा तबला, व्हायोलिन, खंजिरा आणि बासरीच्या जोरदार जुगलबंदीने झाली. एकामागोमाग एक अशा पद्धतीने प्रत्येकाने आपापल्या वाद्यातून स्वर, सूर आणि ताल सादर केले आणि या ‘चतुरंग’जुगलबंदीचा ताल मनात आणि कानात साठवतच मार्गस्थ झाले.

जयतीर्थ मेवुंडी यांचे शास्त्रीय गायन
महोत्सवाच्या पहिल्या सत्रात जयतीर्थ मेवुंडी यांचे शास्त्रीय गायन सादर झाले. राग पुरियाने त्यांनी मैफलीची सुरुवात केली. त्यानंतर जोग रागातील ‘बलमा कब आओगे तुम’ ही बंदिश सादर झाली. ‘बाजे रे मुरलिया बाजे रे’ या रचनेने मेवुंडी यांनी रंगलेल्या मैफलीची सांगता केली. कधी मृदू तर कधी पहाडी आवाज आणि विजेच्या चपळाईसारखी गळ्यातील तान यामुळे रसिकांनी या मैफलीचाही आनंद पुरेपूर घेतला.
‘स्वरप्रभा ट्रस्ट’चे संस्थापक आणि ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. प्रभाकर कारेकर या वेळी उपस्थित होते.