पद्मभूषण श्रीनिवास खळे यांच्या जन्मजयंतीनिमित्त त्यांचा सहवास लाभलेले ज्येष्ठ संगीतकर्मी अरविंद मुखेडकर आणि प्रतिथ यश गायक, वादक मंडळी यांच्या सहभागाने पाल्र्याच्या अरविंद कलायतन या संगीताला वाहिलेल्या मिशनने खळेंना स्वरवंदना देणारा सोहळा ४ मे रोजी दादर येथे आयोजित केला आहे. यावेळी श्रीनिवास खळे उत्तेजना पुरस्काराचे वितरणही होणार आहे.
लोकसत्ता प्रस्तुत या पर्वास विशेष अतिथी म्हणून कविश्रेष्ठ पद्मभूषण मंगेश पाडगावकर उपस्थित राहणार आहे. गायक अमोल बावडेकर, माधुरी करमरकर, सुचित्रा भागवत, योगिता चितळे, विद्या करलगीकर, तेजल व्यास, सारिका शिंदे, अपर्णा बल्लाळ, राशी हरमळकर तर संगीतकर्मी महेश खानोलकर, संदीप कुलकर्णी, दिलीप हडकर, सागर साठे, अमोघ दांडेकर, जगदीश मयेकर, अनिल करंजवकर, विनायक राणे, आणि इंडस्ट्री व्हायोलीनच्या ताफ्यासह संगीतकर अरविंद मुखेडकर या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. वसुताई श्रीनिवास खळे यांच्या प्रेरणेने व अरुण दाते, अशोक पत्की, प. उल्हास बापट, रवींद्र साठे, कमलेस भडकमकर आदींच्या सहकार्याने ही स्वरपूजा बांधली गेली आहे.
अरविंद कलायतनतर्फे संगीतातल्या जिज्ञासू अभ्यासकाला पद्मभूषण श्रीनिवास खळे उत्तेजना पुरस्कार दिला जाणार आहे. प्रथम वर्षांचा हा पुरस्कार राशी हरमळकर या १० वर्षांच्या बाल गायिकेस मंगेश पाडगावकर यांच्या हस्ते दिला जाईल. कार्यक्रम विनामूल्य असून सकाळी १०. ३० वाजता स्वातंत्रवीर सावरकर सभागृह,  शिवाजी पार्क, दादर येथे हा कार्यक्रम होईल.