ढगाळ वातावरणामुळे स्वाईन फ्लूचा धोका वाढला असून जिल्हा शासकीय रुग्णालयात आतापर्यंत स्वाईन फ्लू सदृश्य आजाराचे १६ रुग्ण दाखल झाले आहेत. त्यात एका चिमुरडय़ाचा समावेश आहे. रुग्णांचे अहवाल येत्या दोन दिवसात प्राप्त होणार असून त्यानुसार पुढील उपचार केले जातील. तुर्तास १६ रुग्णांची प्रकृती स्थिर असून औषधोपचारांना ते प्रतिसाद देत असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.
राज्यात स्वाइन फ्लू बाधीत रुग्णांची वाढती संख्या पाहता राष्ट्रीय आरोग्य अभियानाने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सोमवारी परिस्थिती जाणून घेतली. यावेळी महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एकनाथ माले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन होले आदी उपस्थित होते. एप्रिल २०१४ ते फेब्रुवारी २०१५ या कालावधीत स्वाईन फ्लू आजाराची लक्षणे असलेली १०० हून अधिक संशयित आढळले. त्यातील २० रुग्णांना स्वाईन फ्लू असल्याचे निष्पन्न झाले. त्यात नाशिक शहरासह येवला, निफाड, मालेगाव, सिन्नर, चांदवड परिसरातील रुग्णांचा समावेश आहे. या पाश्र्वभूमीवर, वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य विभागाला काही सूचना करण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या सर्व रुग्णालयांत स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक टॅमी फ्लूचा औषध साठा, रुग्णालयात बाह्य़ रुग्णांसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘विशेष कक्ष’चा आढावा घेण्यात आला. दुसरीकडे, जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वतंत्र कक्षात ३० खाटा तसेच ३० हून अधिक ऑक्सिजन सिलिंडर, २ व्हेंटीलेटरसह मुबलक औषधसाठा उपलब्ध आहे. रुग्णांचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून दोन दिवसात या संदर्भातील अहवाल प्राप्त होतील. स्वाईन फ्लूच्या प्रबोधनासाठी जिल्हा रुग्णालय माहिती पत्रकासह सार्वजनिक ठिकाणी भित्तीपत्रके लावणार असल्याचे डॉ. माले यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून जनजागृतीसह प्राथमिक रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. प्रत्येक रुग्णालयात दोन खाटा स्वाईन फ्लूसदृश्य रुग्णांसाठी राखीव असल्याचे डॉ. वाकचौरे यांनी सांगितले.