सध्या संसर्गजन्य ‘स्वाईन फ्लू’ने सर्वत्र धुमाकूळ घातला असून आतापर्यत नागपुरातील विविध रुग्णालयांत २६ नागरिकांचे बळी गेले आहेत, तर १३६ नागरिकांना या आजाराची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दिवसेंदिवस स्वाईन फ्लू बाधितांची व मृत्यूमुखी पडणाऱ्यांची वाढती संख्या पाहून जनजागृतीसाठी आरोग्य आणि शिक्षण विभाग सरसावला आहे. आरोग्य विभाग आपल्या परीने प्रयत्न करत असतानाच शिक्षण विभागही शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये जागृती घडवून आणत आहेत. यानिमित्त शासकीय शाळेतील मुख्याध्यापकांना प्रशिक्षण देण्यात आले आहेत. परंतु खासगी शाळेतील शिक्षकांना मात्र तशा सूचना अद्यापपर्यंत गेल्या नाहीत. तरीही आपल्या पातळीवर या खासगी शाळाही प्रयत्न करीत आहेत.
सध्याचे वातावरण हे स्वाईन फ्लूचा प्रसार आणि प्रचार होण्यास सहाय्यभूत ठरत आहेत. नागरिकांमध्ये स्वाईन फ्लूबाबत जागृती व्हावी, यासाठी शहरातील प्रत्येक महापालिकेच्या प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांना प्रशिक्षण देण्यात आले आहेत. ‘स्वाईन फ्लू’मुळे मृत्युमूखी पडणाऱ्यांची व बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी आरोग्य विभागातर्फे विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. स्वासोच्छवास आणि खोकल्यामुळे या आजाराचा प्रसार होतो. खोकला, तीव्र ताप, नाकातून पाणी पडणे, सर्दी अशी लक्षणे दिसून येणाऱ्या मुलांना शाळेत येण्यापासून परावृत्त करावे. अशा मुलांचा शोध घेऊन त्याची माहिती आरोग्य कर्मचाऱ्यांना द्यावी, अशा सूचना या प्रशिक्षणात मुख्याध्यापकांना दिल्या गेल्या आहेत. ग्रामीण भागात तर आरोग्य विभाग आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने काही संस्थांची मदत घेऊन प्रत्येक गावांमध्ये प्रभातफेऱ्या काढण्यात येत आहे.  यासंदर्भात शिक्षक भारतीचे नागपूर जिल्हा कार्यवाह दिलीप तडस म्हणाले, महापालिकेने याबाबत आम्हाला कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. परंतु आम्ही आमच्या पातळीवरून शाळेत येणाऱ्या मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवत आहोत. खोकला, सर्दी, तीव्र ताप आल्याचे दिसून आल्यास अशा विद्यार्थ्यांना शाळेत न येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच अशा विद्यार्थ्यांनी गर्दीत जाऊ नये, असेही सांगण्यात येत असल्याचे तडस यांनी सांगितले.विदर्भ कला शिक्षक संघाचे नागपूर जिल्हाध्यक्ष राजकुमार बोंबाटे म्हणाले, स्वाईन फ्ल्यूचा वाढता प्रकोप पाहून आम्ही विद्यार्थ्यांना सावध राहण्याच्या सूचना देणार आहोत. खासगी शाळेतील मुख्याध्यापकांना आरोग्य खात्यातर्फे प्रशिक्षण न दिल्याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली. उमरेड तालुक्यातील चांफा येथील विजय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे संचालक विजय भोयर म्हणाले,  स्वाईन फ्ल्यूपासून कसा बचाव करावा, याबाबतच्या सूचना इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत.   
तंत्रनिकेतनमधील शिक्षकाच्या मृत्यूने खळबळ
ब्रम्हपुरी तंत्रनिकेतनमधील शिक्षक देवराव येलमुले यांचा ११ फेब्रुवारीला स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याने भीतीपोटी या तंत्रनिकेतनमधील तब्बल एक हजार विद्यार्थी घरी निघून गेले. या पाश्र्वभूमीवर आरोग्य विभाग शिक्षण विभाग व अन्य विभागाच्या मदतीने ग्रामीण आणि शहरी भागात जनजागृती करीत आहे. शहर आणि ग्रामीणमधील शासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांना प्रशिक्षण दिले जात आहे. ५० टक्क्यांपेक्षा अधिक शाळांतील मुख्याध्यापकांना प्रशिक्षण दिले गेल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. स्वाईन फ्लूने यावर्षी १५ फेब्रुवारीपर्यंत नागपुर जिल्ह्य़ात २६, चंद्रपूर जिल्ह्य़ात ३ आणि अमरावती जिल्ह्य़ात २ असे विदर्भात एकूण ३१ व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
हे करावे
० ताप, पडसे आणि खोकला असेल तर रुग्णालयात जावे.
० पडसे, खोकला असणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात फार वेळ राहू नये.
० स्वयंपाक करताना हात स्वच्छ धुवावेत.
० शिंका आल्यास तोंडावर रुमाल धरून ठेवावा.
० गर्दीत जाताना मास्कचा वापर करावा.