25 May 2020

News Flash

स्वाइन फ्लूने एका महिलेचा मृत्यू झाल्याने शासन यंत्रणेला खडबडून जाग

पनवेल तालुक्याच्या परिसरामध्ये स्वाइन फ्लूने एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर जनजागृतीची विशेष बैठक सोमवारी पनवेल येथील जेष्ठ नागरिक सभागृहात घेण्यात आली.

| February 25, 2015 07:33 am

पनवेल तालुक्याच्या परिसरामध्ये स्वाइन फ्लूने एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर जनजागृतीची विशेष बैठक सोमवारी पनवेल येथील जेष्ठ नागरिक सभागृहात घेण्यात आली. कामोठे येथे राहणाऱ्या प्रविणा राजकुमार जितेकर या महिलेचा मृत्यू स्वाइन फ्लूने झाला असल्याची माहिती याच बैठकीत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र इतकरे यांनी दिली. स्वाइन फ्लूचे इतर संशयित रुग्ण नवीन पनवेल, खारघर, कामोठे, कळंबोली, पनवेल शहर व ग्रामीण पनवेलमध्ये आहेत. ही बैठक आरोग्य विभाग व पनवेलच्या ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत डॉक्टरांनी कशा प्रकारे उपचार करावे, सामान्यांनी कशी प्रतिबंधक काळजी घ्यावी याविषयीचे मार्गदर्शन सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींना व उपस्थित डॉक्टरांना केले. 

स्वाइन फ्लूने जितेकर या रुग्णाचा बळी गेल्यानंतर का होईना पण प्रतिबंधक उपाययोजना व जनजागृतीला सुरुवात झाली याबद्दल पनवेलच्या अनेक रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. जनजागृतीच्या या बैठकीत एमजीएम रुग्णालयामध्ये स्वाइन फ्लूच्या विलगीकरण विशेष कक्षात होणाऱ्या गलथानपणाच्या समस्या अनेक डॉक्टरांनी मांडल्या. पनवेल व इतर तालुक्यांतील स्वाइन फ्लूच्या रुग्णांच्या उपचारासाठी एमजीएम हे एकमेव रुग्णालय आहे. येथे २० खाटा आरक्षित असल्याचे सांगण्यात आले, मात्र कामोठे येथील खासगी डॉक्टर स्वाइन फ्लूचा संशयित रुग्णांना एमजीएम रुग्णालयामध्ये पाठविल्यानंतर त्याच रुग्णांना काही तासांमध्ये प्रकृती बरी असल्याचे सांगून घरी पाठविण्यात येत असल्याचा खुलासा डॉ. स्वाती हांडे यांनी या बैठकीत केल्याने एमजीएम रुग्णालयाच्या कारभाराविषयी येथे चिंता व्यक्त करण्यात आली. आमदार ठाकुरांनी या बैठकीत एमजीएम रुग्णालयाला कारभार चोख करण्याच्या सूचना एमजीएमचे डॉ. उमाकांत देशपांडे यांना दिल्या. एमजीएम रुग्णालयातील औषधांच्या तुटवडय़ाची चर्चा येथे झाली. तसेच पनवेलमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना औषधालयात एचवन एनवनचे मास्क मिळत नसल्याच्या तक्रारी अनेकांनी सांगितल्या. विशेष म्हणजे पनवेलच्या आरोग्य विभागाकडेसुद्धा एचवन एनवनचे अवघे ४० मास्क उपलब्ध आहेत. एमजीएम प्रशासन या विलगीकरणाच्या कक्षातील डॉक्टरांना लागणाऱ्या मास्कची किंमत रुग्णाच्या नातेवाईकांकडून वसूल करतात अशाही तक्रारी या वेळी समोर आल्या. पनवेलच्या आरोग्य विभागाने स्वाइन फ्लूच्या भीतीने पनवेलकरांनी घाबरून न जाता जवळपासच्या रुग्णांची माहिती आरोग्य विभागाला कळवावी असे आवाहन केले आहे. रुग्णांची अधिकची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. बस्वराज लोहारे यांच्या मोबाइल क्रमांक ८६५५००७७०५ संपर्क साधावा असे आवाहन या वेळी करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2015 7:33 am

Web Title: swine flu in navi mumbai
टॅग Death,Swine Flu
Next Stories
1 अल्पवयीन मुलांमधील अमली पदार्थाची वाढती नशा..
2 केंद्राच्या नव्या भूसंपादन कायद्याविरोधात उरणमध्ये धरणे आंदोलन
3 निष्क्रिय अभियंत्याला निलंबित करण्याची मागणी
Just Now!
X