नवी मुंबई परिसरात निदान झालेले स्वाइन फ्लूचे रुग्ण लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेने त्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यासाठी पावले उचलली आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने स्वाइन फ्लूबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. नवी मुंबई महापौर सागर नाईक व आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून या स्वाइन फ्लूबाबतच्या वस्तुस्थितीचा नुकताच आढावा घेतला.
स्वाइन फ्लू आजाराच्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात आरोग्य विभागाच्या वतीने विविध प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. यामध्ये महापालिका कार्यक्षेत्रात २७ ठिकाणी स्क्रीनिंग सेंटर्स सुरू करण्यात आली आहेत. तर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिक तसेच खाजगी रुग्णालयेच यांना स्वाइन फ्लू आजारावर निदान व उपचार करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे वाशी येथील सार्वजनिक रुग्णालय तसेच नेरुळ येथील डॉ.डी.वाय पाटील रुग्णालय या ठिकाणी आंतररुग्ण केंद्रे सुरू करण्यात आलेली आहेत. आवश्यक साधनसामग्रीची, औषधांची, उपकरणांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय हँड बिल, पोस्टर्स, फ्लेक्स, बॅनर्स, वर्तमानपत्र प्रसिद्धी, सिनेमागृह प्रसिद्धी अशा विविध प्रकारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.
तर स्वाइन फ्लूबाबत नागरिकांनी योग्य ती काळजी घेतल्यास स्वाइन फ्लूपासून दूर राहणे शक्य आहे. याबाबत अधिकची माहिती हवी असल्यास किंवा स्वाइन फ्लूचा संशयित रुग्ण आढळून आल्यास महानगरपालिकेचे घराजवळचे नागरी आरोग्य केंद्र तसेच सार्वजनिक रुग्णालय वाशी, माता बाल रुग्णालय नेरुळ, तुभ्रे, कोपरखरणे, ऐरोली व डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालय येथे संपर्क साधवा असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.