राज्यभरात स्वाईन फ्ल्यूने थैमान घातले आहे. ठाणे, मुंबईतही त्याचे रुग्ण आढळले असून नवी मुंबईत स्वाईन फ्ल्यूचे ४७ रुग्ण महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यापैकी ३७ रुग्ण हे नवी मुंबईतील रहिवासी आहेत, तर १० रुग्ण मुंबई, ठाणेमधील आहेत. अवकाळी पावसामुळे गेल्या चार दिवसांपासून वातावरणात बदल झाल्यामुळे सर्दी, खोकला, घशात खवखव तसेच तापाचे रुग्ण वाढले आहेत. यामुळे पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रापासून खाजगी रुग्णालयामध्ये रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे.
नागरिकांनी स्वाईन फ्ल्यूचा धसका घेतला असून नेरुळ येथे स्वाईन फ्ल्यू या आजाराने ग्रस्त झालेल्या रुग्णाने उपचार सुरू असतानाच रुग्णालयातून पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. हा आजार पूर्णपणे बरा होता, या आजाराने भयभीत होण्याची आवश्यकता नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले असले तरीही त्याचा धसका कायम असल्याचे दिसते.
नवी मुंबई परिसरात निदान झालेले स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेने त्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यासाठी पावले उचलली आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने स्वाईन फ्ल्यूबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. महापालिका कार्यक्षेत्रात २७ स्क्रीनिंन सेंटर्स सुरू करण्यात आली आहेत. खाजगी वैद्यकीय व्यावसायिक तसेच खाजगी रुग्णालयांनाच स्वाईन फ्ल्यू आजारावर निदान व उपचार करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येत असून वाशी येथील सार्वजनिक रुग्णालय तसेच नेरुळ येथील डॉ. डी. वाय पाटील रुग्णालय या ठिकाणी आंतररुग्ण केंद्र सुरू करण्यात आले आहे. आवश्यक साधन सामग्रीची, औषधांची उपकरणांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच महापालिका क्षेत्रात हँड बिल, पोस्टर्स, फ्लेक्स, बॅनर्स, वर्तमानपत्र प्रसिद्धी, सिनेमागृह प्रसिद्धी अशा विविध प्रकारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत असल्याचे नवी मुंबई आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. दीपक परोपकारी यांनी सांगितले.