पनवेलमध्ये स्वाइन फ्लूचे दोन संशयित रुग्ण सापडल्याने परिसरात घबराट पसरली आहे. सापडलेले संशयित रुग्ण कामोठे येथील महात्मा गांधी मिशन (एमजीएम) रुग्णालयात उपचार घेत आहेत. स्वाइन फ्लूचा शिरकाव तालुक्यात झाल्याने पनवेलकरांच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त होत आहे. आरोग्य विभागाने सध्या याबाबत पनवेलमध्ये कोणतीही जनजागृतीची मोहीम हाती घेतली नाही. सध्या एमजीएम रुग्णालयाने मंगळवारपासून या भयानक आजारावर उपचारासाठी वेगळा वॉर्ड सुरू केला आहे. दोन दिवसांपूर्वी येथे उपचार घेत असलेल्या रुग्णाला एचवन एनवनची लागण झाली असल्याच्या संशय बळावल्याने त्याला मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले. येथे अजून दोन रुग्णांवर उपचार होत आहेत. या दोघांमध्ये एक महिला व एक पुरुष रुग्ण आहेत. या दोनही रुग्णांचे नाव देण्यास एमजीएम प्रशासनाने नकार दिला आहे. या बातमीची वाच्यता बाहेर होऊ नये यासाठी रुग्णालय प्रशासन व पनवेलच्या आरोग्य विभागाने पूर्णत: गोपनीयता बाळगली आहे. डॉ. गवळी यांनी पनवेलकरांना स्वाइन फ्लूपासून बचावण्यासाठी सर्दी, खोकला असणाऱ्या व्यक्तीपासून दूरचे अंतर ठेवा, जेवणापूर्वी पंधरा मिनिटे आधी हात साबणाने स्वच्छ धुण्याचा सल्ला दिला आहे. किरकोळ आजारासाठी औषध घेण्यापूर्वी नजीकच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तसेच गर्दीची ठिकाणे टाळावीत, असे सुचविले आहे.