संसर्गजन्य ‘स्वाईन फ्लू’ने शहरात धुमाकूळ घातला असून आतापर्यंत १४ नागरिकांचे बळी गेले आहेत. सध्याचे वातावरण हे स्वाईन फ्लूचा प्रसार आणि प्रचार होण्यास सहाय्यभूत ठरत आहेत. त्यामुळे नागरिकांनीच स्वत:हून काळजी घ्यावी, असा सल्ला शहरातील डॉक्टरांनी दिला आहे.
२०१३ मध्ये नागपुरात स्वाईन फ्लूने २८ रुग्णांचा बळी गेला होता, तेव्हा खूपच दहशत निर्माण झाली होती. नागरिकही स्वत:हून काळजी घेत होते. श्वासोच्छवास आणि खोकल्यामुळे हा आजार होत असल्याने नागरिक तोंड व नाकाला माक्स लावताना दिसून येत होते. २०१४ मध्ये मात्र प्रमाण कमी झाले. या एका वर्षांत फक्त १० नागरिकांचाच मृत्यू झाला. पूर्वीच्या तुलनेत मृत्यूची संख्या कमी असल्याने आरोग्य विभागही थोडा सुस्त झाला होता. नागरिकही दुर्लक्ष करू लागले. परंतु, नवीन वर्षांची सुरुवात होताच स्वाईन फ्लूचे रुग्ण मोठय़ा संख्येने दिसून येऊ लागले. ६ फेब्रुवारीपर्यंत शहरातील विविध रुग्णालयात स्वाईन फ्लूने १४ नागरिकांचा बळी गेला आहे. यामध्ये ८ नागपूर शहरातील, ४ नागपूर ग्रामीणमधील आणि २ नागपूर जिल्ह्य़ाबाहेरील रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ४२ नागरिकांना स्वाईन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
स्वाईन फ्लूची संख्या वाढत असल्याचे लक्षात येताच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ३० खाटांचा एक नवीन वॉर्ड तयार करण्यात आला. या वॉर्डात चार जीवनरक्षक प्रणालीची व्यवस्था करण्यात आली आहे. या वॉर्डात सेवा देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. सध्या मेडिकलमध्ये १९ रुग्ण दाखल असून त्यामध्ये १६ रुग्ण ‘पॉझिटिव्ह’ आहेत. यातील एका रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे. तर तिघांना जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले असल्याची माहिती मेडिकलच्या सूत्रांनी दिली.
यावर्षी मेडिकलमध्ये उपचारादरम्यान ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. स्वाईन फ्लू हा आजार डुकरापासून होत असला तरी एकदा तो मानवाच्या संपर्कात आला तर त्याचा प्रसार झपाटय़ाने होतो. ज्यांना हा आजार झाला, त्यापैकी २१ टक्के रुग्ण दूर अंतरावरून प्रवास करून आले आहेत.
याशिवाय शहरातील अन्य रुग्णालयांतही दहापेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरू असावेत, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
खोकला येणे, शिंक येणे, ताप येणे ही स्वाईन फ्ल्यू आजाराची लक्षणे आहेत. ही लक्षणे दिसताच ताबडतोब रुग्णालयात जाऊन तपासणी करणे आवश्यक आहे. परंतु साधा आजार असल्याचे समजून नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात. आजार गंभीर झाल्यानंतर काही रुग्ण खासगी रुग्णालयात जातात. खासगी रुग्णालयात पैसा खर्च करूनही जेव्हा काहीच आराम होत नाही, तेव्हा मेडिकलसह शासकीय रुग्णालयात धाव घेतली जाते. यानंतरही अशा रुग्णांना वाचवण्यासाठी येथील डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करतात. परंतु आजार एवढा गंभीर झालेला असतो की, तेव्हा सर्व मार्ग बंद झालेले असतात. अशा स्थितीत रुग्णाचा मृत्यू होतो. त्यामुळे लक्षणे दिसताच ताबडतोब शासकीय रुग्णालयात जाऊन उपचार करून घ्यावे, असा सल्ला महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. श्याम शेंडे यांनी दिला आहे. शहरात स्वाईन फ्ल्यूने धुमाकूळ घातला असताना महापालिकेची आरोग्य सेवा मात्र कुचकामी ठरली आहे. या आजाराचे संशयित रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयात गेले असताना त्यांना मेडिकल, मेयो किंवा खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देतात. परंतु त्या रुग्णावर उपचार करण्यास पुढे येत नाही. त्यामुळे सर्वाधिक रुग्ण मेडिकलमध्ये येत आहेत. संशयित रुग्णांच्या नाक व घशातील द्रव्याचे नुमने घेऊन ते तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठवले जातात. अवघ्या चार तासात नमुन्याचे अहवाल प्राप्त होतात. अहवालावरून पुढील दिशा प्राप्त होते. तत्पूर्वी रुग्णांची स्थिती पाहून औषधोपचार केले जात आहेत.

मेडिकलमध्ये सर्व तयारी
स्वाईन फ्लूची लागण लक्षात घेता मेडिकलमध्ये ३० खाटांचा एक स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे. येथे येणाऱ्या रुग्णांवर योग्य उपचार केले जात आहेत. वॉर्डात चार जीवनरक्षक प्रणाली असून औषधांचा पुरेसा साठाही उपलब्ध आहे. शिंका किंवा खोकला येत असल्याने रुमाल तोंडावर धरून ठेवावा. गर्दीत काळजी घ्यावी. लक्षणे दिसताच ताबडतोब मेडिकलमध्ये यावे. स्वाईन फ्लूने मृत्यूमुखी पडणाऱ्यांपेक्षा उपचारामुळे वाचणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
डॉ. जे.बी. हेडाऊ, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल