वातावरणातील बदलाचा अनिष्ट परिणाम स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढण्यात होत असल्याचे निरीक्षण नोंदविले जात असताना दुसरीकडे विभागात नाशिक महापालिका हद्दीत या आजाराने चार महिन्यात सर्वाधिक म्हणजे २५ जणांचा मृत्यू झाल्याची बाब पुढे आली आहे. जानेवारीपासून नाशिक विभागात या आजाराने एकूण ४० जणांचा मृत्यू झाला. त्यात सर्वाधिक संख्या महापालिका हद्दीत आहे. सिंहस्थ कुंभमेळा सुरू होण्यास काही दिवसांचा अवधी असताना या आजारावर नियंत्रण ठेवण्यास पालिकेला यश आलेले नाही. या पाश्र्वभूमीवर, कुंभमेळ्यासाठी दाखल होणाऱ्या लाखो भाविकांच्या आरोग्याची धुरा पालिकेची यंत्रणा कशी सांभाळणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
स्वाइन फ्लूच्या सद्यस्थितीची माहिती आरोग्य यंत्रणेला विचार करायला लावणारी आहे. स्वाइन फ्लूच्या रुग्णांची वाढ होऊ लागल्यामुळे नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात काहिसे चिंतेचे वातावरण आहे. काही वर्षांपूर्वी या आजाराने नाशिक विभागात भीतीदायक स्थिती निर्माण केली होती. यंदाच्या वर्षांतील सद्यस्थितीचा आढावा घेतल्यास स्थिती आटोक्यात नसल्याचे दिसते. मागील तीन ते चार महिन्यात वातावरणात कमालीचे बदल झाले. गारपीट, अवकाळी पाऊस आणि उकाडा असे विचित्र स्वरूपाचे वातावरण आहे. तापमानाचा पारा सध्या ४० अंशावर पोहोचला आहे. ही स्थिती स्वाइन फ्लूच्या विषाणुच्या प्रसाराला कारक ठरल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. नाशिक विभागात चार महिन्यात ३७ हजार ५२८ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक २७ हजार १७०, धुळे ८६२६, जळगाव ६१२, नंदुरबार १९२ जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील संशयित ४६९८ रुग्णांना टॅमी फ्लूच्या गोळ्या देऊन उपचार करण्यात आले. संबंधितांच्या थुंकीचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत तपासले असता त्यात २८७ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. नाशिक विभागात आतापर्यंत ४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात सर्वाधिक संख्या नाशिक महापालिका हद्दीतील असल्याचे दिसत आहे.
नाशिक महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार शहरात स्वाइन फ्लू आजाराने जे ३१ मृत्यू झाले त्यातील १४ जण नाशिक शहरातील रहिवासी होते. उर्वरित १७ रुग्ण हे ग्रामीण भागातील होते. स्वाइन फ्लूच्या रुग्णावर उपचार करण्याची सुविधा महापालिकेच्या सर्व रुग्णालयात असली तरी रुग्णाला दाखल करावयाचे असल्यास केवळ डॉ. जाकीर हुसेन रुग्णालयात व्यवस्था आहे. या ठिकाणी व्हेंटिलेटरसह अन्य सुविधा उपलब्ध करण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी आर. बी. गायकवाड यांनी नमूद केले. स्वाइन फ्लूच्या विषाणूंचा प्रसार गर्दीच्या ठिकाणी झपाटय़ाने होऊ शकतो. सिंहस्थात नाशिकमध्ये लाखो भाविक दाखल होतील. त्यावेळी या आजाराच्या दृष्टिकोनातून कसे नियोजन करण्यात आले आहे, याबद्दल विचारणा केली असता गायकवाड यांनी सुविधा वृद्धिंगत केल्या जात असल्याचे मांडले. महापालिका हद्दीत आतापर्यंत ३०३८ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील १२८८ संशयित रुग्णांना टॅमी फ्लू देण्यात आली. पालिकेच्या आरोग्य विभागाकडे सद्यस्थितीत २५०० टॅमी फ्लू गोळ्यांचा साठा आहे. सिंहस्थासाठी अतिरिक्त गोळ्यांची मागणी केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
या आजाराची लागण होणाऱ्यांत प्रामुख्याने गरोदर महिलांसह मधुमेह व तणावग्रस्त मनस्थितीत वावरणारे रुग्ण यांचा समावेश आहे. अन्य व्याधी जडलेल्या रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याची अधिक शक्यता असते. उन्हाळ्यात या आजाराचा प्रादुर्भाव काही अंशी कमी होईल, असा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचा अंदाज याआधी फोल ठरला आहे. घसा खवखवणे, ताप, खोकला, अंगदुखी अशी काही प्राथमिक लक्षणे रुग्णात आढळून आल्यास त्यास स्वाईन फ्लूची लागण झालेली आहे असे गृहीत धरून उपचार केले जातात. अशी लक्षणे दिसत असल्यास रुग्णाला स्वतंत्र कक्षात वा खोलीत ठेवावे लागते. सिंहस्थातील भाविकांची संख्या लक्षात घेऊन आरोग्य विभागाने तसे काय नियोजन केले ही बाब अनुत्तरित आहे.