News Flash

पनवेल शहरासह तालुक्यात स्वाइन फ्ल्यूचे थैमान

पनवेल शहरासह तालुक्यामध्ये स्वाइन फ्ल्यूचे १४ रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाने पुन्हा जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे.

| August 18, 2015 07:56 am

लहान मुलांची विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. (प्रातिनिधीक छायाचित्र)

पनवेल शहरासह तालुक्यामध्ये स्वाइन फ्ल्यूचे १४ रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाने पुन्हा जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. स्वाइन फ्ल्यूबाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयातील स्वाइन फ्ल्यूच्या विशेष कक्षात उपचार सुरू आहेत. १४ पैकी चार रुग्ण पनवेल शहरामधील ठाणानाका परिसरात राहणारे असल्याने पनवेल नगर परिषदेने सावधगिरीची उपाययोजना राबवत शहरातील डुकर हटाव मोहीम हाती घेतली आहे. यासाठी नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने शहरातील डुकरांचा व्यवसाय आणि सांभाळ करणाऱ्या २५ डुकरमालकांना लवकरात लवकर डुकरांचे स्थलांतरण करा अन्यथा त्यांचे व्यवस्थित पालन करा, असे नोटिसीत बजावले आहे.
हवामानातील तापमानाच्या बदलामुळे स्वाइन फ्ल्यूचा प्रादुर्भाव झाल्याचे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पावसाळ्यापूर्वी कामोठे येथील एका महिलेचा स्वाइन फ्ल्यूने मृत्यू झाल्यानंतर आरोग्य विभागाने जनजागृतीची मोहीम मोठय़ा प्रमाणात राबविली होती. त्यानंतर पावसाळ्यात वातावरण थंड झाल्याने स्वाइन फ्ल्यूच्या रुग्णांचे तालुक्यातील प्रमाण घटले. परंतु आठवडाभरापासून वातावरणातील बदलामुळे पुन्हा स्वाइन फ्ल्यूच्या आजाराने डोके वर काढले, त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पनवेल नगर परिषदेने यासाठी शुक्रवारपासून शहरभर दवंडी पिटली तसेच गावातील नाल्यांमध्ये धूरफवारणी केली आणि पंधरा ठिकाणी चौकात स्वाइन फ्ल्यू या आजाराविषयीचे जागृतीचे फलक उभारल्याची माहिती नगर परिषदेचे आरोग्य अधिकारी दिलीप कदम यांनी दिली. पनवेलमध्ये बावन बंगला, रिद्धीसिद्धी परिसर येथे स्वाइन फ्ल्यूचे बाधित रुग्ण आहेत. तसेच शहरामधील वाल्मीकीनगर आणि लक्ष्मी वसाहत तसेच काही झोपडपट्टींमध्ये डुकरांची विक्री करण्याचा व्यवसाय केला जातो. शहरामध्ये डुकरांच्या मांस विक्रीचा धंदा तेजीत असला तरीही, स्वाइन फ्ल्यूच्या आजारामुळे प्रशासनाला व्यवसाय काही काळासाठी तरी बंद ठेवा, असे बोलण्याची वेळ आली आहे.

रुग्णांची प्रकृती स्थिर
पनवेल शहरासह संपूर्ण तालुक्यामध्ये स्वाइन फ्ल्यू या आजाराने बाधितांची संख्या १४ वर पोहचली आहे. पनवेल शहरामध्ये चार, नवीन पनवेल वसाहत, खैरणे येथील देवीचा पाडा, कामोठे वसाहत आणि नेरे गाव या परिसरात प्रत्येकी एक रुग्ण आढळले आहेत. तसेच खारघर वसाहतीमध्ये सर्वाधिक चार रुग्ण स्वाइन फ्ल्यूचे आहेत. महाड व श्रीवर्धन येथून आलेले रुग्ण पनवेलमध्येच उपचार घेत आहेत. या सर्वाची प्रकृती स्थिर आहे.

घ्यावयाची काळजी
सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, ताप किंवा घशाचे दुखणे अशी लक्षणे असल्यास त्वरित आपल्या नजीकच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने त्वरित उपचार घ्यावेत. खोकला व सर्दी असलेल्या व्यक्तींनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे गरजेचे आहे. मास्क वापरण्याऐवजी खोकला व सर्दीच्या रुग्णांनी कापडी स्वच्छ रुमाल तोंडावर ठेवूनच शिंकावे व खोकावे. खोकला व सर्दीचे रुग्ण शक्यतो घरातील वृद्ध, बालकांपासून अशा वेळी दूर ठेवावेत, असे आवाहन पनवेल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बस्वराज लोहारे यांनी केले आहे. पनवेल ग्रामीण रुग्णालय आणि कामोठे येथील एमजीएम रुग्णालयामध्ये स्वाइन फ्ल्यूच्या औषधांचा साठा उपलब्ध आहे. तसेच एमजीएम रुग्णालयामध्ये २० खाटांचा एक स्वाइन फ्ल्यू विशेष कक्ष स्थापन करण्यात आल्याचे डॉ. लोहारे म्हणाले. स्वाइन फ्ल्यू या आजारावर प्रतिबंधक लस आहे. परंतु ही लस स्वाइन फ्ल्यू कक्षामध्ये काम करणाऱ्या वॉर्डबॉय व डॉक्टर यांच्यासाठीच वापरावेत, असेही जागतिक आरोग्य संस्थेने ठरवून दिलेल्या नियमावलीत म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 18, 2015 7:56 am

Web Title: swine flue in panvel
टॅग : Panvel
Next Stories
1 कांद्याच्या साठीवर इजिप्त, इराकच्या कांद्याचा उतारा
2 कळंबोली येथील सेंट जोसेफ शाळेच्या इमारतीला दोन मजल्यांपर्यंतच भोगवटा प्रमाणपत्र
3 मोफत रुग्णसेवा पुरविणारा पडद्याआडचा समाजसेवक दामुअण्णा ठाकूर यांना श्रद्धांजली
Just Now!
X