ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सहलीला येणाऱ्या शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये ही बससेवा सुरू करण्याच्या दृष्टीने ताडोबा व्यवस्थापनाचे प्रयत्न सुरू आहेत.
पट्टेदार वाघांच्या अस्तित्वाने ताडोबा-अंधारी व्याघ्र जागतिक पातळीवर प्रसिध्द झाला आहे. त्यामुळे देशविदेशातील पर्यटक लाखोच्या संख्येने या प्रकल्पाला भेटी देतात. यावर्षी आतापर्यंत जवळपास सव्वा लाख पर्यटकांनी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली आहे. ताडोबात जंगल सफारी करणे म्हणजे किमान चार ते पाच हजार रुपये खर्च होतात. हा खर्च सर्वसामान्य पर्यटकांना झेपणारा नाही, ही बाब लक्षात घेऊन ताडोबा व्यवस्थापनाने यावर्षी सामान्य पर्यटकांसाठी बससेवा सुरू केली. १९ प्रवाशांची आसनक्षमता असलेल्या या बसने जंगल भ्रमंती करण्यासाठी एका पर्यटकाला अवघे १५० रुपये शुल्क आकारले जाते, तर सुटीच्या दिवशी हेच शुल्क २०० रुपये आहे. त्यामुळे एका गरीब कुटुंबाला सुध्दा एक हजार रुपयात जंगल भ्रमंतीचा आनंद लुटता येतो. त्यामुळे या बसला पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद बघूनच ताडोबा व्यवस्थापनाने दुसरी बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ही बस केवळ विद्यार्थ्यांसाठी राहणार आहे. ताडोबा-अंधारी फाऊंडेशनच्या माध्यमातून या बसची खरेदी करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव ताडोबाचे क्षेत्र संचालक गरड यांनी तयार केलेला आहे. ताडोबा प्रकल्पाला दरवर्षी हजारो विद्यार्थी भेट देतात. यातील बहुतांश विद्यार्थी संशोधनासाठी सुध्दा आलेले असतात. त्यामुळे त्यांना जिप्सी, खासगी गाडी परवडणारी नसते. अशा विद्यार्थ्यांना सहज व सुलभ जंगल पर्यटनाच्या आनंदासोबतच अभ्यासपूर्ण माहिती गोळा करता यावी म्हणून ही बस सुरू केली जाणार आहे. तसेच दरवर्षी ताडोबात विदर्भातील अकरा जिल्हे व मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगलोर व देशाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहली येतात. या सहलींना सुध्दा प्रत्येक वेळी जिप्सी करणे कठीण जाते. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना एकाच वेळी जंगल पर्यटनाचा आनंद घेता यावा, अशी ही योजना आहे. साधारणत: ऑक्टोबरमध्ये ही बससेवा सुरू केली जाणार असल्याची माहिती आहे. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे ताडोबातील काही ठराविक रस्ते सुरू आहेत. त्यामुळे हिवाळ्यात ताडोबातील सर्व रस्ते खुले झाल्यानंतर ही बस सुध्दा येणार आहे.