न्यायालयात असलेल्या खटल्याचा लवकर निर्णय लागला तर समाजाचे स्वास्थ्य टिकून राहते. त्यामुळे लोकअदालतीचा फायदा समाजातील सर्व घटकांनी घ्यावा, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांनी केले.
न्याय मंदिरात राष्ट्रीय विधि सेवा दिनाच्या मुहूर्तावर नागपुरात राज्यातील पहिल्या स्थायी लोकअदालतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश सुभाष मोहोड, स्थायी लोकअदालतीचे अध्यक्ष न्यायाधीश एस.एस. बुरडकर, जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. विजय कोल्हे, जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष कमल सतुजा, जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव किशोर जयस्वाल व्यासपीठावर उपस्थित होते.  असंख्य प्रकरणांमुळे न्यायदानास विलंब होतो. त्यामुळे भांडणापेक्षा तडजोड बरी असा सामंजस्य संदेश घेऊन आलेली लोकअदालत, महालोकअदालत, राष्ट्रीय लोकअदालत लोकप्रिय होत असून त्यामुळे न्याय व्यवस्थेवरील तान कमी होत आहे. या प्रक्रियेमुळे लोकांना त्वरित न्याय मिळू लागला आहे, असे न्या. धर्माधिकारी म्हणाले.
न्या. मोहोड म्हणाले, लोकअदालतीचा मुख्य उद्देश दोन्ही पक्षामध्ये तडजोड घडवून आणणे असा आहे. तडजोड न झाल्यास नैसर्गिक न्याय पद्धतीने न्याय निवाडा देण्याचा अधिकार या लोकअदालतीला आहे. या लोकअदालतीने दिलेल्या निर्णयाविरुद्ध कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येणार नसल्याने या लोकअदालतीचा निर्णय अंतिम राहणार आहे. वीज, नागरी सुविधा, परिवहन, आरोग्य आणि सेवानिवृत्तीची प्रकरणे अशा कोणत्याही न्यायालयात दाखलपूर्व प्रकरणात या लोकन्यायालयात हाताळल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. पक्षकारांचा वेळ व पैसा खर्च होत असून आपसातील समझोत्याने समाजाला जास्तीत जास्त न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे स्थायी लोकअदालतीचे अध्यक्ष न्या. बुरडकर म्हणाले.
अ‍ॅड. विजय कोल्हे व अ‍ॅड. कमल सतूजा यांनीही विचार मांडले. स्थायी लोकन्यायालयात स्पॅन्कोची पाचशे व बीएसनएनएलची अनेक प्रकरणे सुरुवातीलाच दाखल होत आहेत. या लोकअदालतीचे कामकाज सोमवारपासून सुरू झाल्याची माहिती न्यायाधीश किशोर जयस्वाल यांनी दिली.
संचालन अर्चना काशीकर यांनी तर दिवाणी न्यायाधीश देशपांडे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास न्यायिक अधिकारी प्रशिक्षण संस्थेचे सहसंचालक एस.जी. मेहरे, कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्या. यू.के. हनवते, स्थायी लोकअदालतीचे सदस्य अ‍ॅड. राजेंद्र राठी, छाया यादव यांच्यासह न्यायाधीश, प्रशिक्षित मध्यस्थ, विधि महाविद्यालयाचे विद्यार्थी, वकील उपस्थित होते.