लिपिकाकडून प्रवास भत्ता देण्यासाठी १८०० रुपये लाच घेतल्याप्रकरणी कळमेश्वर नगरपरिषदेच्या एका रोखपालाला भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याच्या पथकाने मंगळवारी रंगेगाथ अटक केली.
भालचंद्र विनायक मंडलिक हे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. कळमेश्वर नगर परिषदेचे लिपिक दीपक भय्याजी संकुलवार यांना ८ हजार ४६५ रुपयांचे प्रवास भत्ता देयक मंजूर झाले होते. ते देण्यासाठी त्यांनी तेथील रोखपाल भालचंद्र मंडलिक यांची भेट घेतली. त्यासाठी मंडलिक यांनी १ हजार ८०० रुपये मागितले. संकुलवार यांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याचे अधीक्षक निशीथ मिश्र यांची भेट घेऊन तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा करून मिश्र यांनी सापळा रचण्याचे आदेश दिले. आज संकुलवार यांनी मंडलिक यांची भेट घेऊन ८ हजार ४६५ रुपये प्रवास भत्ता मागितला.
आरोपी मंडलिक यांनी ६ हजार ६६५ रुपये संकुलवार यांना देत १८०० रुपये स्वत:जवळ ठेवून घेतले. भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याच्या पथकाने आरोपी मंडलिक यांना पकडले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे, सुरेश लांबट, उपअधीक्षक हरिश्चंद्र रेड्डीवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.