महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत सहभागी होणाऱ्या गावांचा निरुत्साह कायम असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा त्यांची संख्या आणखी ५४ गावांनी घसरली आहे. २०१३-१४ या वर्षांत या मोहिमेत ८८५ गावे सहभागी झाली असून ही संख्या २०१२-१३ मध्ये ९३९ इतकी होती.
गावासाठी गावातच लोकसहभागातून तात्काळ व सर्वमान्य तोडगा घडवून आणण्याची व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गांव मोहीम राबविली जात आहे. परंतु, काही ग्रामपंचायतींच्या अनास्थेमुळे नाशिक जिल्ह्याचा १०० टक्के सहभागी होण्याचा निकष अपूर्ण रहात असल्याचे अधोरेखित झाले आहे.
इतर जिल्ह्यात सर्वच गांवे मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी होत दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात काही ग्रामपंचायतींमुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.
सलग तीन वर्षांपासून ही परंपरा कायम राहिल्याने मोहिमेत सहभागी न होणाऱ्या ग्रामपंचायतींना तंटामुक्त वातावरण नको आहे की काय, अशी साशंकता निर्माण झाली आहे. या मोहिमेत २०१३-१४ मध्ये ८८५ मध्ये सहभागी झाली आहेत. तत्पूर्वीच्या २०१२-१३ वर्षांत ९३९ गावे सहभागी झाली होती. २०११-१२ मध्ये हीच संख्या संख्या १०७५ गावे इतकी होती. २०१०-११ वर्षांत १,३४७ गावांनी सहभाग नोंदविला होता.
मागील चार वर्षांतील आकडेवारीचा आढावा घेतल्यास नाशिकच्या सहभागित्वाचे प्रमाण घटल्याचे लक्षात येते. गावांची संख्या कमी होण्यामागे ग्रामपंचायत व इतर निवडणूक हे कारण असल्याचे सांगितले जाते.
ग्रामपंचायत निवडणुकीत रमलेल्या ग्रामस्थांनी विहित मुदतीत सहभागी होण्यात अनास्था दाखविली. त्याची परिणती हे प्रमाण कमी होण्यात झाले आहे. शासनाने दिलेल्या कार्यक्रमानुसार १५ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट या कालावधीत मोहिमेमध्ये सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या ग्रामपंचायतींना ग्रामसभा आयोजित करावी लागते. या ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला जातो.
त्यानंतर मोहिमेत सहभाग घेऊ इच्छित असल्याबाबतचे पत्र व तंटामुक्त गाव समिती सदस्यांची यादी संबंधित पोलीस ठाणे प्रमुखास ग्रामपंचायतींना द्यावे लागते. अनेक गावांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नसल्याने एकूण सहभागित्वाचे प्रमाण कमी झाले.