तांत्रिकाकडून तरुणीवर बलात्कार
प्रतिनिधी, मुंबई
स्वयंघोषित तांत्रिकाकडून एका तरुणीवर बलात्कार केल्याची घटना बोरिवलीत उघडकीस आली आहे. कस्तुरबा मार्ग पोलिसांनी या कथित तांत्रिकाला अटक केली आहे. हा स्वयंघोषित तांत्रिक बोरिवलीत एक विवाह जुळवून देणारे केंद्र चालवतो. त्याच्या कार्यालयात पीडित तरुणी टेलिफोन ऑपरेटर म्हणून काही वर्षांपासून काम करत होती. तिचे लग्न जमत नव्हते. तेव्हा तुझ्यावर भूतप्रेताची बाधा असून पूजा करावी लागेल असे या आरोपी तांत्रिकाने तिला सांगितले. पूजा करण्याच्या नावाखाली त्याने तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला.
दोन वर्षांपूर्वी या तरुणीचे लग्न झाले होते. तेव्हाही तिची काढलेली अश्लील छायाचित्रे पतीला दाखवेन अशी धमकी देत तो तिच्यावर बलात्कार करत होता.
अखेर रविवारी या तरुणीने कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या स्वयंघोषित बाबाला अटक केली. त्याच्या कार्यालयातून पोलिसांनी अनेक आक्षेपार्ह वस्तू जप्त केल्या आहेत.

प्रेयसीची चाकूचे वार करून हत्या
प्रतिनिधी, मुंबई<br />विवाहित प्रेयसीची प्रियकराने चाकूचे वार करून हत्या केल्याची घटना रविवारी रात्री साकीनाका येथे घडली. घटनेनंतर पळून जाणाऱ्या आरोपीला बीट मार्शलने पाठलाग करून अटक केली. अमरनाथ जैसवाल (३८) हा अंधेरीच्या एमआयडीसी परिसरातील सुभाष नगर येथे राहतो. याच परिसरात राहणाऱ्या संगीता पुजारी (४०) या विवाहित महिलेशी त्याचे प्रेमसंबध होते. अमरनाथसुद्धा विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. संगीता ही तक्षशीला मार्केटमध्ये मासेविक्रीचा व्यवसाय करते. मात्र संगीताची अन्य एका व्यक्तीबरोबर जवळची मैत्री असल्याचा अमरनाथला संशय होता. त्यामुळे तो संतापला होता. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मद्याच्या नशेत असलेला अमरनाथ तक्षशीला बाजारात चाकू घेऊन आला. या मुद्दय़ावरून त्याचे आणि संगीताचे भांडण झाले. रागाच्या भरात त्याने संगीतावर चाकूने वार केले. तिला वाचवायला संगीताची मैत्रीण बबिता सिंग मध्ये पडली होती. तिच्यावरही अमरनाथने वार केले. गंभीर जखमी असलेल्या संगीताचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. हल्ला करून पळून जात असलेल्या अमरनाथला गस्तीवरील बीट मार्शलने पाठलाग करून अटक केली. जखमी बबितावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.