उन्हाळ्याच्या सुट्टीत वाजवी दरात पोहण्याचा आनंद लुटण्याचे डोंबिवलीतील एकमेव ठिकाण म्हणजे कल्याण-डोंबिवली महापालिकेचा सावळाराम महाराज क्रीडासंकुलातील तरणतलाव. मात्र, हा तरणतलाव गेल्या दोन महिन्यापासून बंद असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. ऐन सुट्टीच्या हंगामात तरण तलाव बंद ठेवून महापालिका प्रशासन कोणाचे हित साधत आहे, असा प्रश्न नागरिकांकडून केला जात आहे.
फेब्रुवारी महिन्यापासून डोंबिवलीतील क्रीडा संकुलातील तरणतलाव बंद आहे. तलावात पाणी नसल्याने तलावाच्या तळाला चिखल साचला आहे. तलावात शुद्ध पाणी सोडण्यासाठी असलेली शुद्धीकरणाची यंत्रणा ठप्प आहे. दोन महिने तलाव परिसरात कोणतीही साफसफाई होत नसल्याने सर्वत्र पडझड झाल्याचे चित्र दिसून येत आहे. तलाव कोणत्या कारणासाठी बंद आहे याचे कोणतेही कारण सदस्यांना महापालिकेकडून देण्यात येत नाही. या तलावाच्या शेजारीच असलेल्या व्यायामशाळेतील साहित्यावर धुळीची पुटे चढली आहेत, असे सदस्य नागरिक व प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले. दररोज सकाळी आणि संध्याकाळी अनेक सदस्य नागरिक महापालिकेच्या तरणतलावात पोहण्यासाठी येत असत. विशेषकरून मुलांचा भरणा अधिक असतो. इतर जिमखान्यांच्या तुलनेत महापालिकेचे दर वाजवी असल्याने सामान्य नागरिकांसाठी महापालिकेचा हा तरणतलाव हक्काचे ठिकाण मानले जाते. मात्र, उन्हाळ्याच्या सुटय़ा लागल्या तरीही तरणतलाव आणि येथील सुविधा बंद असल्यामुळे रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होऊ लागला आहे. उन्हाळा सुट्टीच्या हंगामात तलाव बंद ठेवून नागरिकांचा हिरमोड केलाच, शिवाय महापालिकेने स्वत:चे महसुली उत्पन्नही बुडवले असा नागरिकांच्या तक्रारीचा सूर आहे.
तिथला पैसा तेथेच  
सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील महापालिकेच्या क्रीडाविषयक सोयीसुविधांवर आतापर्यंत ठेकेदारांनीच मौज केली असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. यापुढे या सुविधांपासून नागरिकांना मुबलक नागरी सुविधा देण्याबरोबर तरणतलाव, व्यायामशाळा या माध्यमातून महापालिकेला महसूल मिळावा, असे गृहीत धरण्यात आले होते. क्रीडा संकुलात येणाऱ्या नागरिकांसाठी चहा, खानपानाची सुविधा देण्यासाठी कॅफेटेरिया सुरू करणे गरजेचे होते. या माध्यमातून महापालिकेला जो महसूल मिळेल, तो महसूल क्रीडा संकुलातील सुविधांच्या देखभाल दुरुस्तीसाठी वापरता येईल. या देखभालीसाठी महापालिकेच्या तिजोरीवर ताण नको, असा विचार प्रशासनाकडून सुरू आहे. क्रीडासंकुलातील ठेका देण्याचा प्रस्ताव तीन महिन्यापूर्वी सर्वसाधारण सभेने मंजूर केला आहे.
निविदेला प्रतिसाद नाही
महापालिकेच्या मालमत्ता विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले, क्रीडासंकुलातील सुविधा ठेकेदारी पद्धतीने चालवण्यासाठी निविदा प्रक्रिया करण्यात आली होती. त्याला प्रतिसाद मिळाला नाही. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता चालू असल्याने ही प्रक्रिया थांबवली होती. आचारसंहिता उठताच नव्याने निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. निवडणूक तसेच आचारसंहितेमुळे या प्रक्रियेला विलंब लागला असल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.