01 March 2021

News Flash

तासगावचा रथोत्सव उत्साहात

अडीच शतकाकडे वाटचाल करणारा सांगली जिल्ह्यातील तासगावचा रथोत्सव मंगळवारी मोठय़ा उत्साहात साजरा झाला. या रथोत्सवासाठी सांगली,सातारासह कर्नाटकातील सुमारे पन्नास हजार गणेशभक्तांनी हजेरी लावली.

| September 11, 2013 02:06 am

अडीच शतकाकडे वाटचाल करणारा सांगली जिल्ह्यातील तासगावचा रथोत्सव मंगळवारी मोठय़ा उत्साहात साजरा झाला. या रथोत्सवासाठी सांगली,सातारासह कर्नाटकातील सुमारे पन्नास हजार गणेशभक्तांनी हजेरी लावली. गणेश भक्तांसोबतच वरुणराजानेही प्रदीर्घ विश्रांतीनंतर हजेरी लावल्याने गणेश भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
मंगळवारी दुपारी तासगावच्या गणेश मंदिरापासून रथोत्सवाला प्रारंभ झाला. ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या काशी विश्वेश्वर मंदिरापर्यंत या रथाची मार्गक्रमणा पूर्ण करण्यास चार ते पाच तासांचा अवधी लागला. हजारो भक्तगण गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात हा रथ ओढण्यासाठी उत्साहाने सहभागी झाले होते. रथ ओढणाऱ्या भाविकांवर गुलाल,खोबऱ्याची आणि पेढय़ांची उधळण होत होती.
मराठेशाहीचे पेशवेकालीन सेनापती श्रीमंत परशुरामभाऊ पटवर्धन यांनी १७७९ मध्ये या रथोत्सवाचा प्रारंभ केला. तेव्हापासून साजरा होत असलेला हा तासगावच्या सांस्कृतिक जीवनाचा मानिबदू ठरला आहे. या वर्षी 234 वा रथोत्सव साजरा झाला. तासगावमध्ये उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक असून दीड दिवसाचा गणेशोत्सव या ठिकाणी साजरा केला जातो. या गणेश मंदिराच्या ठिकाणी पटवर्धनांनी उभे केलेले सात मजली गोपूर ९६ फूट उंचीचे असून भक्तांचे व इतिहासाच्या अभ्यासकांचे आकर्षण ठरले आहे.
रथोत्सवाचा प्रारंभ गणेश मंदिरापासून करण्यात आला. दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी लोखंडी रथ बनविण्यात आला असून तो केळीच्या खुंटांनी सजविण्यात येतो. या रथाला दोर बांधून भक्तांच्याकडून हा रथ ओढत ५०० मीटरवरील काशीविश्व्ोश्वर मंदिरानजिक नेण्यात आला.  या ठिकाणी श्रींच्या उत्सवी मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
आज रथोत्सवासाठी श्रीगणपती पंचायतनचे विश्वस्त श्रीमंत राजेंद्र पटवर्धन, निरंजन पटवर्धन यांच्यासह आ. संजय(काका) पाटील, माजी राज्यमंत्री अजित घोरपडे यांच्यासह अनेक राजकीय कार्यकत्रे सहभागी झाले होते. तासगावमध्ये रथोत्सव शांततेत पार पडावा यासाठी मोठय़ा प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उपअधीक्षक दिलीप शंकर वार, श्रीमती पौर्णिमा चौगुले यांच्यासह २ पोलीस निरिक्षक, १८ पोलीस अधिकारी, १४४ पोलीस कर्मचारी, राज्य राखीव दल, शीघ्रकृती दल यांची प्रत्येकी एक तुकडी आणि गृहरक्षक दल बंदोबस्तासाठी तनात होते.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2013 2:06 am

Web Title: tasgaon chariot festival celebrated in enthusiasm
टॅग : Celebrated,Enthusiasm
Next Stories
1 सांगली महापालिकेतील स्वीकृत, स्थायी सदस्यांच्या निवडी २०सप्टेंबर रोजी
2 कोल्हापुरात न्यायालयासमोर वकिलांचे धरणे आंदोलन
3 जुन्या पिढीतील व्हॉलिबॉलपटू आकाराम पाटील यांचे निधन
Just Now!
X