News Flash

तासगाव कारखान्याचा भाडेकरारही लांबला

‘आधीच उल्हास... त्यात फाल्गुन मास’अशी अवस्था गृहमंत्री आर. आर. पाटील सभासद असणा-या आणि गेली ७-८ वष्रे आíथक कोंडीशी सामना करणा-या तासगाव सहकारी साखर कारखान्याची झाली

| November 6, 2013 02:09 am

‘आधीच उल्हास… त्यात फाल्गुन मास’अशी अवस्था गृहमंत्री आर. आर. पाटील सभासद असणा-या आणि गेली ७-८ वष्रे आíथक कोंडीशी सामना करणा-या तासगाव सहकारी साखर कारखान्याची झाली आहे. साखर कारखाना विक्रीस न्यायालयाने मनाई देताच भाडेपट्टा करारावर कारखाना चालविण्यास सोनहिरा साखर कारखाना पुढे आला असता निविदावेळी असणा-या शर्ती अटींच्या मुद्यावर कारखाना सुरू होण्यास पुन्हा विलंब लागणार आहे.
तासगावचे तत्कालीन नेते कै. दिनकर आबा पाटील यांनी प्रदीर्घ राजकीय संघर्षांनंतर कारखान्याची उभारणी केली. सांगली जिल्ह्याचे प्रस्थापित नेतृत्व झुगारुन त्यांनी तासगावच्या कारखान्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्याशी संधान साधून कारखान्याला मंजुरी मिळविली होती. त्यांच्या पश्चात गृहमंत्री आर. आर. पाटील व  सांगलीचे पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने कारखान्याची धुरा आपल्या शिरावर घेतली होती.
राजकीय संघर्षांनंतर कारखान्याची आíथक स्थिती खालावत गेली. कारखाना कर्जबाजारी झाला. कारखाना सुरु करण्यासाठी आíथक कोंडी फोडणे गरजेचे होते. मात्र कारखान्याच्या आíथक आजारावर राज्य शिखर बँकेने ‘शस्त्रक्रिया’ न करता भाडेपट्टी कराराची मलमपट्टी करुन तात्पुरता इलाज करण्याचा प्रयत्न केला. संजय (काका) पाटील यांच्या गणपती जिल्हा संघाने भाडेपट्टा कराराने हा साखर कारखाना चालविण्यास घेतला होता. या रक्कमेत केवळ कर्जाचे व्याज आणि अल्पशी परतफेड होऊ शकली. मात्र, मूळचे कर्ज काही संपुष्टात येऊ शकले नाही.
तासगाव साखर कारखान्याची देणी फेडण्यासाठी राज्य बँकेने कारखाना विक्रीस काढला होता. गणपती जिल्हा संघाने कारखाना खरेदी करण्याची तयारी दर्शविली. मात्र याचवेळी न्यायालयाने विक्री न करता कारखाना भाडेतत्वावर देण्याचा आदेश दिला. भाडेतत्वावर आलेल्या निविदांनुसार पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे बंधू मोहनराव कदम अध्यक्ष असणा-या सोनहिरा साखर कारखान्याने १० कोटी १० लाखांची सर्वाधिक बोली लावून हा कारखाना चालविण्याची तयारी दर्शविली.
राज्यातील गळीतहंगाम सुरु होत असला तरी, न्यायालयीन लढाया, कारखान्याचा ताबा कोणाकडे यावरुन सुरु असणारी आंदोलने, गणपती जिल्हा संघाने उचललेली यंत्रसामुग्री,ताबा देण्यास लावलेला कालावधी यामध्येच यंदाचा हंगामातला महत्वाचा वेळ वाया चालला आहे. राज्य बँकेने दोन दिवसांपूर्वी सोनहिरा कारखान्याला कारखाना चालू करण्यापूर्वी अनामत पोटी ३ कोटी ५० लाख रुपये भरण्यासाठी पत्र दिले आहे. या पत्रावर प्रत्युत्तर म्हणून सोनहिराने हंगाम वेळेत सुरु होत नसल्याने अपेक्षित गाळप होणे असंभवनीय आहे. त्यामुळे निविदेतील अटी व शर्ती यामध्ये बदल करण्याची मागणी केली आहे. सोनहिराने आपले म्हणणे मांडताना निविदा दाखल करतेवेळी असणारी स्थिती आणि सद्य:स्थिती यामध्ये फरक असल्याचे निदर्शनास आणले आहे. कारखाना सुरु करण्यासाठी नव्याने काही यंत्रसामग्री वापरावी लागणार आहे. त्याची रक्कम देकार रकमेतून वजा करण्याची मागणी केली आहे. यावर राज्य बँकेने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नसली तरी, यंदाच्या हंगामात कागदोपत्री लढाई रंगण्याची चिन्हे असल्याने कारखाना वेळेत सुरु होईल आणि अपेक्षित गाळप होईल ही अपेक्षा मात्र दिवास्वप्नच ठरते की काय, अशी भीती सभासद व कामगारांची आहे.
 
 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2013 2:09 am

Web Title: tasgaon plant rent agreement delayed
Next Stories
1 सोलापुरात अपु-या सुरक्षा व्यवस्थेमुळेच रेल्वे प्रवाशांची सुरक्षितता टांगणीला…
2 कोल्हापुरात गुळाचे सौदे मुहूर्तालाच बंद
3 सहा महिन्यांत निळवंडेचे दरवाजे बसवू- महसूलमंत्री
Just Now!
X