पर्यावरणस्नेही जीवनशैलीचा पुरस्कार करण्याच्या हेतूने टाटा समूहाने येथील त्यांच्या टेक्नो कॅम्पसमध्ये ‘सूर्य आरण्य’ प्रकल्प राबवून अपारंपरिक ऊर्जेने बगिच्यातील दिवे प्रकाशमान केले. टाटा कॅपिटल, सेंटर फॉर इन्व्हायरमेंटल रिसर्च अ‍ॅण्ड एज्युकेशन (सीईआरई) आणि लोढा बिल्डर्स यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेला अशा प्रकारचा हा भारतातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प आहे. पोखरण रोडवरील टाटा समूहाच्या बगिच्यात राबविण्यात आलेल्या या प्रकल्पात एकूण सहा कृत्रिम वृक्ष उभारण्यात आले असून त्यावरील १४ पॅनल्सद्वारे दररोज एकूण ७५० व्ॉट वीजनिर्मिती होणार आहे. त्याद्वारे त्या उद्यानातील २८ दिवे सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतच प्रकाशमान होणार आहेत. या प्रकल्पासाठी एकूण ३० लाख रुपये खर्च झाल्याची माहिती यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. ‘टाटा सन्स’चे डॉ. मुकुंद राजन आणि टाटा कॅपिटल लिमिटेडचे अमर सिंह यांच्या उपस्थितीत मंगळवारी या प्रकल्पाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. या प्रकल्पात साध्या अथवा सीएफएलऐवजी कमी ऊर्जा वापरणारे एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. पारंपरिक ऊर्जानिर्मितीमध्ये जीवाश्म इंधन वापरले जात असल्याने जैव विविधतेचा ऱ्हास होतो. या पर्यावरणीय समस्येवर अपारंपरिक ऊर्जा हाच एक उपाय आहे. या सूर्य आरण्यातील प्रत्येक वृक्षाच्या बुंध्यावर भारतातून नामशेष होऊ लागलेल्या एका रोपटय़ाचे अथवा प्राणी प्रजातीचे चित्र आहे. पर्यावरणीय जीवनशैलीचा पुरस्कार करण्यासाठी टाटा समूहातर्फे भारतभर अशा प्रकारचे प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.