गोदावरी कालव्यांमधून शेतीसाठी पाण्याचे आर्वतन देण्याबाबत जलसंपदा विभागाच्या संबंधीत अधिकाऱ्यांनी उपलब्ध पाणीसाठय़ाचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे आदेश जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी दिले.
प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव बिपीन कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने काल (मंगळवारी) मुंबई येथे तटकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी नियमीत तीन आर्वतने देण्याचे मान्य केले. माजी मंत्री शंकरराव कोल्हे यावेळी उपस्थित होते. बिपीन कोल्हे यांनी सांगितले की, गोदावरी कालव्यांना वर्षांनुवर्षे पाण्याची कमतरता असतानाही दरवर्षी फेब्रुवारीपुर्वी तीन आणि उन्हाळयात दोन अशी पाच आर्वतने दिली जात होती. यंदा मात्र पाटबंधारे खात्याच्या भोंगळ कारभारामुळे या कालव्यांवर अवलंबून असलेली शेती पिके उध्दवस्त झाली आहेत. पिकांचे होणारे नुकसान लक्षात घेता पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठीही तातडीने आर्वतन सोडावे. पिण्याच्या पाण्याच्या कोपरगांव, राहाता, शिर्डी, पुणतांबा, घोयेगांव आदी सर्वच तलावात जेमतेम १५ ते ४५ टक्केच पाणी मिळाले. त्याचा हिशोब मागवून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
वैतरणेचे अतिरिक्त पाणी मुकणे धरणांत वळविण्यांचा निर्णय झालेला असतानाही त्या भागातील एकाच गावच्या रहिवाशांनी हा प्रश्न लावून धरला आहे. मागील बैठकीत सव्‍‌र्हेक्षणात कोणी आडकाठी आणीत असेल तर तो मोडून काढण्याचे आदेश देण्यात आले होते. तरीही गेल्या १५ वर्षांपासून हे काम रखडले आहे. गोदावरी कालव्यांना १०० वर्षे पुर्ण झाले असून नुतणीकरणाचे काम सन १९८३ पासून हाती घेण्यात आले आहे. मागच्या २९ वर्षांत ३६४ कामांपैकी अवघी ५६ कामे पुर्ण झाली आहेत. दरवर्षी मिळणारा निधी लक्षात घेता ही कामे अजुनही २० ते ३० वर्षांत पुर्ण होणार नाहीत अशी खंत कोल्हे यांनी व्यक्त केली.
पश्चिमवाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे अतिरिक्त पाणी पुर्वेला वळविण्याच्या कामास गती देण्यांत यावी. पश्चिमवाहिनी नद्यांच्या पाण्यांतर्गत प्रवरा नदीचे कार्यक्षेत्रात लघू पाटबंधारे प्रस्तावित केल्याचे समजते. त्याच धर्तीवर मोठय़ा योजनेचे सव्‍‌र्हेक्षण करून गोदावरी खोऱ्यात पाणी वळविण्याची व्यवस्था करावी अशी मागणीही बिपीन कोल्हे यांनी केली. त्यावर तटकरे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी अभ्यास करून तात्काळ अहवाल सादर करावा असे सांगितले.