देशाच्या सर्वागीण विकासासाठी प्राप्तीकर हा महत्वाचा उत्पन्न स्त्रोत आहे. देशातील विकास कामांसाठी याच निधीतून खर्च केला जातो. त्यामुळे करदात्यांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता तात्काळ प्राप्तीकर विवरण दाखल करण्याचे आवाहन संयुक्त प्राप्तीकर आयुक्त वाय.डी.गोहिल यांनी केले. विदर्भ चेम्बर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी व सदस्य, सनदी अंकेक्षक, कर सल्लागार व वकिलांना ते मार्गदर्शन करीत होते. अकोला, वाशिम व बुलढाणा येथील करदाता जनजागृती मेळाव्यात त्यांनी हे आवाहन केले.
यंदाच्या आर्थिक वर्षांत ज्यांनी कोणी ३० लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचे घर, शेत, प्लॉट इत्यादी अचल संपत्ती खरेदी किंवा विक्री केली आहे, अशा सर्वाची माहिती प्राप्तीकर खात्याकडे आहे. असा व्यवहार करणाऱ्यांनी अग्रीम कर अर्थात, अॅडव्हान्स टॅक्स भरलेला नसल्यास त्यांना प्राप्तीकर विभागाने नोटीस पाठवली आहे. या सर्वानी त्यांचा अग्रीम कर १५ मार्चपूर्वी भरावा. जे कोणी असा कर भरण्यास अपात्र आहे त्यांनी याबाबत प्राप्तीकर खात्याला अवगत करावे. असे न केल्यास अग्रीम कर न भरणाऱ्यांवर विभाग कडक कारवाई करेल, असा इशारा संयुक्त आयकर आयुक्त वाय.डी.गोहिल यांनी दिला. अकोला, बुलढाणा व वाशिम जिल्ह्य़ातील करपात्र उत्पन्न असलेल्या पॅनकार्डधारक व्यापाऱ्यांची संख्या मोठी आहे. या जिल्ह्य़ातील बरेच व्यापारी गेल्या अनेक वर्षांंपासून त्याचे प्राप्तीकर विवरण (इन्कम टॅक्स रिटर्न) दाखल करत नाही. यंदाचे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी प्राप्तीकर खात्यात संबंधितांनी तात्काळ प्राप्तीकर विवरण दाखल करावे. या सर्व बडय़ा व्यापाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती खात्याकडे आहे. जे व्यापारी प्राप्तीकर विवरण दाखल करणार नाहीत त्यांच्याविरोधात नियमानुसार कडक कारवाईचा इशारा संयुक्त आयकर आयुक्तांनी दिला.  राज्याच्या विक्रीकर विभागाने हवाला पध्दतीने व्यवहार करणाऱ्यांची ओळख केली आहे. त्यांना प्राप्तीकर खात्याने खुलासा करण्याचे पत्र पाठविले असून अशा सर्वानी त्याच्या स्थितीचा खुलासा तात्काळ करावा, असे संयुक्त आयकर आयुक्तांनी सांगितले. कंपनी कायद्यानुसार नोंदणीकृत कंपन्यांना प्राप्तीकर विवरण दाखल करणे हे बंधनकारक असून त्यांनी तात्काळ आर्थिक वर्षांचे प्राप्तीकर विवरण दाखल करावे व अप्रिय कारवाईपासून बचाव करावा, असे आवाहन प्राप्तीकर विभागाने केले आहे. एआयआर व टिडीएस भरणाऱ्या प्राप्तीकर दात्यांनी त्यांचे प्राप्तीकर विवरण वेळेवर दाखल करण्याचे आवाहन प्राप्तीकर खात्याने केले आहे.
विदर्भ चेम्बर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी व सदस्य, सनदी अंकेक्षक, वकील, आयकर अधिकारी यांची मोठी उपस्थिती छोटेखानी जनजागृती मेळाव्यास होती.