क्षयरोग हा गंभीर आजार असून त्वरित निदान आणि नियमित उपचार घेतल्यास पूर्णपणे बरा होऊ शकतो. मात्र नियमित उपचार आणि विशेष काळजी न घेतल्यास या आजाराची इतरांना लागण होऊ शकते, असे मत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी व्यक्त केले.
क्षयरोग जनजागृती सप्ताहनिमित्त राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्रात आयोजित कार्यशाळेत ते अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी विकास आणि प्रशासन विभागाचे उपायुक्त एन.पी. मित्रगोत्री, नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, प्राचार्या डॉ. पद्मजा जोगेवार, राज्य क्षयरोग नियंत्रण केंद्राचे संचालक डॉ. नदीम खान प्रामुख्याने उपस्थित होते. क्षयरोग हा संसर्गजन्य आजार असल्याने तो अन्य व्यक्तीला होतो. प्रतिकार शक्ती कमी झाल्यानंतर या आजाराची तीव्रता अधिक असते. तेव्हा आरोग्य सेवेत काम करणाऱ्यांनी नागरिकांना वेगवेगळ्या स्तरावरून तसेच वेगवेगळ्या माध्यमातून माहिती द्यावी, असे आवाहन एन.पी. मित्रगोत्री यांनी केले. यावेळी वरिष्ठ क्षयरोग तज्ज्ञ डॉ. रवींद्र सरनाईक यांनी डॉ. संदीप भारसवाडकर यांनी ‘क्षयरोगाची कारणे व त्यावरील उपाय’ या विषयावर सविस्तर माहिती दिली.
याप्रसंगी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. माध्यमा चहांदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षां भोंबे, डॉ. मनीषा खोब्रागडे, डॉ. विक्रम राठी, डॉ. बी.आर. आमटे प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी ज्योती कन्नाके आणि आरोग्यसेवक प्रशिक्षणार्थी शशीकांत मडावी यांनी संचालन केले. डॉ. नदीम खान यांनी आभार मानले.