शैक्षणिक स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांच्या मनात पुस्तकातील अभ्यासाव्यतिरिक्त चमत्कार किंवा भोंदूगिरीच्या प्रथा मोडीत काढण्यासाठी प्रत्यक्ष विज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखवून अंधश्रद्धेचे उच्चाटन करण्यासाठी महेंद्र नारायण नाईक हे शिक्षक गेल्या दहा वर्षांपासून अनेक विद्यालयांना भेट देत आहेत. स्वत:च्या कुटुंबापासून समाजप्रबोधनाची सुरुवात करणारे नाईक गुरुजी विद्यादानासोबत सामाजिक बांधिलकी जपत अंधश्रद्धेविरोधात जनजागृतीची मुहूर्तमेढ रोवत आहेत. अशा या नाईक गुरुजींचे सहकारी त्यांना आधुनिक चळवळीतला कार्यकर्ता म्हणतात तर विद्यार्थी त्यांना विज्ञानाचे गुरुजी असे म्हणतात.  
नाईक गुरुजी अलिबाग तालुक्यातील चौल गावामधील मूळचे राहणारे आहेत. स्वत:पासून समाज सुधारण्याची वृत्ती असलेले नाईक हे गेल्या १९ वर्षांपासून शिक्षण सेवेत आहेत. प्रसिद्धीचा कोणताही गाजावाजा करण्याची हौस न बाळगणारे नाईक गुरुजी सवणे येथील जिल्हा परिषदेच्या विद्यालयावर प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतात. यात त्यांना जीवनसाथी आरती याही समविचारी मिळाल्या.
२००६ मध्ये आरती यांच्याशी विवाह करताना नाईक गुरुजींनी घातलेली अट ही आज या दाम्पत्याची ओळख बनली आहे. नाईक दाम्पत्यांनी सुखाच्या कुटुंबाची व्याख्या जपताना अनाथाश्रमातून एक मुलगी दत्तक घेऊनच संसार थाटू अशा शर्तीतून स्वत:चा संसाराचा सारीपाट मांडला. स्त्रीभ्रूण हत्यांसाठी प्रबोधन आपल्या घरापासून करण्याचा समविचार नाईक दाम्पत्यांनी जपला. आज नाईक गुरुजींच्या घरी त्यामुळेच पाच वर्षांची जेसिका मोठय़ा आनंदाने मायेच्या छत्रछायेखाली वाढत आहे. नाईकांच्या वैयक्तिक आयुष्याप्रमाणे विद्यालयामधील सेवेव्यतिरिक्त वैज्ञानिकता आजची गरज यावर त्यांचे अनेक प्रयोग ते विविध विद्यालयांमध्ये सादर करतात. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून ते अनेक ठिकाणी कार्यशाळांचे आयोजन करतात. यामुळे विद्यार्थ्यांच्या कुतूहलासोबत चमत्काराचा भांडाफोड त्यांनी अनेक पालकांसमोर केला आहे.
नाईक गुरुजींनी आता समाजशास्त्रामधून एमएचे शिक्षण पूर्ण केले आहे. विद्यार्थ्यांच्या शालेय सुटीच्या कालावधीत नाईक गुरुजींनी तब्बल ११ शिबिरे आयोजित केली होती. दिवाळीच्या काळात विविध विद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना फटाक्यांमुळे पर्यावरणाची होणारी हानी पटवून देण्याचे काम नाईक गुरुजी करतात. तसेच पनवेल तालुक्यासह रायगड जिल्ह्य़ामध्ये अनेक ठिकाणी साप आपले शत्रू नव्हे तर मित्र असल्याचा संदेश ते स्लाइड शो आणि पोस्टरच्या माध्यमातून देत आहेत.