महानगरपालिका शिक्षण मंडळाअंतर्गत कार्यरत शिक्षकांना परीक्षा कालावधीत तहसील कार्यालयामार्फत बीएसओ व मतदार यादी पुनर्निरीक्षण कामाचे आदेश देण्यात आले आहेत. ही कामे शिक्षकांना न देता अन्य यंत्रणेमार्फत करण्यात यावीत, शिक्षकांना दिलेले कामकाजाचे आदेश तत्काळ रद्द न झाल्यास सर्व शिक्षक संघटनांच्या महासंघातर्फे सामूहिक बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.
सद्यस्थितीत मनपा शिक्षकांना तहसील कार्यालयामार्फत शालेय स्तरावर हे आदेश देण्यात आलेले आहेत. काही शिक्षकांना केवळ फोनवरून बैठकांचे निरोप देण्यात आले. जे शिक्षक बैठकांना उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांना तहसील कार्यालयामार्फत नोटीस देण्यात आली आहे. खरेतर शिक्षकांना, बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण अधिनियम २००९ कलम २७ अन्वये जनगणना व प्रत्यक्ष निवडणुकाचे कामकाज याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे कामकाज देण्यात येऊ नये, असा महत्त्वपूर्ण निकाल न्यायालयामार्फत देण्यात आलेला असूनही अशा प्रकारची कामे शिक्षकांना ऐन परीक्षांच्या कालावधीत तहसील कार्यालयामार्फत देण्यात आली आहेत. काही शाळांच्या सर्वच शिक्षकांना या कामाचे आदेश दिले असल्याने शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होत आहे. याबाबत मनपा शिक्षकांच्या महासंघातर्फे निवडणूक निर्णय अधिकारी गीतांजली बावीस्कर, तहसीलदार मनोज घोडे, सुचिता भामरे यांना प्रत्यक्ष निवेदन देऊन याबाबत चर्चा करण्यात आली.