भाषा विषयाचे अध्यापन करणाऱ्या प्रत्येक शिक्षकाने सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. साहित्य व साहित्यिक समजून घेऊन साहित्याच्या अभ्यासात सातत्य ठेवले पाहिजे. प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास केल्यास अध्यापन प्रभावी होते, असे प्रतिपादन कवी किशोर पाठक यांनी केले.
नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित शैक्षणिक उपक्रम व आरोग्य समितीच्या वतीने सारडा कन्या विद्यालयात आयोजित मराठी विषय अध्यापन कार्यशाळेत ते बोलत होते. मराठी कवितांचे अध्यापन करताना प्रत्येकाने कविता समजून घेतली पाहिजे. सर्व संत साहित्याचा सखोल अभ्यास केला पाहिजे असेही पाठक यांनी नमूद केले.
अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष रमेश देशमुख होते. यावेळी संस्थेचे सहकार्यवाह दिलीप अहिरे, एकनाथ कडाळे, तानाजी जाधव, समितीचे ज्येष्ठ सदस्य सुभाष सूर्यवंशी, समिती निमंत्रक शिवाजी सोनवणे उपस्थित होते. संस्थेच्या सर्व माध्यमिक शाळेतील मराठी विषयाचे अध्यापन करणारे ५५ शिक्षक कार्यशाळेस उपस्थित होते. देशमुख यांनी प्रास्तविक केले. मनिषा देशपांडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
या प्रसंगी पर्यवेक्षिका सुनंदा जगताप, संध्या जोशी, शिक्षक मंडळ सदस्य दिनेश देवरे, अतुल करंजे, सुधीर पाटील होते. सूत्रसंचलन मुग्धा काळसकर यांनी केले तर सहकार्यवाह दिलीप अहिरे यांनी आभार मानले.