कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांवर आश्वासनाव्यतिरिक्त कोणतीही कार्यवाही न करण्याच्या शासनाच्या धोरणामुळे संतप्त शिक्षकांनी महिनाभरापासून आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्यावतीने सोमवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
जिल्ह्य़ातील कनिष्ठ विद्यालयीन शिक्षक मोठय़ा संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. संघटनेचे नाशिक विभाग उपाध्यक्ष प्राध्यापक टी. एस. ढोली व इतर पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली दुपारी एक वाजता बिटको महाविद्यालयापासून मोर्चास सुरूवात झाली.
प्रचंड घोषणाबाजी करत मागण्यांचे फलक आंदोलकांच्या हाती होते. राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी आजवर केवळ आश्वासन देण्यात समाधान मानल्याची तक्रार नाशिक जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने केली. कायम विना अनुदानित तत्व रद्द करणे, सहाव्या वेतन आयोगातील केंद्राप्रमाणे ग्रेड पे मिळावा, २००५ ते २०१२ पर्यंतच्या प्रस्तावित पदांना त्वरित मान्यता, तुकडी टिकवण्यासाठी माध्यमिक प्रमाणे विद्यार्थी संख्येने अट शिथील करावी, त्रिस्तरीय वेतनश्रेणी १ जानेवारी १९९६ पासून लागू करणे. संपकालीन ४२ रजा खात्यात जमा होणे, विना अनुदान काळातील सेवा वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी ग्राह्य़ धरणे, उपप्राचार्य व पर्यवेक्षक यांच्या ग्रेड पे मध्ये वाढ व्हावी, २४ वर्षांच्या सेवेनंतर निवडश्रेणी विनाअट मिळावी, उपप्राचार्य नियुक्तीनंतर अर्धवेळ शिक्षकास मान्यता मिळावी, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना सेवानिवृत्तीचे वय ६० करावे, विद्यार्थी हितासाठी विज्ञान विषयाचे पूर्वीप्रमाणे दोन स्वतंत्र पेपर असावे व प्रात्यक्षिक परीक्षेसाठी बाह्य़ परीक्षक असावा, शिक्षक सेविकांना प्रसुती रजा देताना शिक्षक सेवकाचा कालावधी वाढू नये, २०१२-२०१३ मधील नियुक्त शिक्षकांना त्वरित मान्यता मिळावी, माहिती तंत्रज्ञान विषय शिक्षकांना त्वरित मान्यता व वेतन मिळावे, कनिष्ठ महाविद्यालयाचे स्वतंत्र प्रशासन असावे, आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आहे. मोर्चेकऱ्यांच्या शिष्ट मंडळाच्यावतीने आपल्या मागण्यांचे निवेदन शिक्षण उपसंचालक कार्यालयास देण्यात आले.
दरम्यान या मोर्चामुळे नाशिक-पुणे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. बिटको चौकात वाहनधारकांना अडकून पडावे लागले. मोर्चा विसर्जित झाल्यानंतर काही तासाने या परिसरातील वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर आली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 22, 2013 12:57 pm