शाळेच्या कार्यालयातच शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा दुर्दैवी प्रकार तालुक्यातील महादेव मळा (वडगावपान) येथील शाळेत घडला. अरुण रामचंद्र हांडे (वय ३२) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव असून, आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
मूळ वनकुटे गावचे रहिवासी असलेले हांडे कोपरगाव तालुक्यातून सन २०११मध्ये संगमनेर तालुक्यात बदलून आले. वडगावपान गावची क्लास शाळा असलेल्या महादेव मळा येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक द्विशिक्षकी शाळेत ते कार्यरत होते. आज नेहमीप्रमाणे ते सकाळी शाळेत आले. दुपारी सव्वा वाजता जेवणाची सुटी झाली असताना ही घटना घडली. जेवण झाल्यानंतर दुसरे शिक्षक शिष्यवृत्तीच्या प्रश्नपत्रिका आणण्यासाठी केंद्रशाळेत गेले होते. सुटी असल्याने मुले मैदानात खेळत होती. त्यात हांडे यांची चार वर्षांची मुलगीही होती. तिनेच सर्वप्रथम घडलेला प्रकार पाहिला. नंतर मुले जमा झाली. दोन वर्गखोल्यांच्या मध्ये असलेल्या छोटय़ा कार्यालयाच्या छताला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली असून, आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही. हांडे यांच्यामागे पत्नी व दोन मुली असून त्यातील एक मुलगी अवघ्या पाच दिवसांची असल्याची माहिती मिळाली.