काही खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये कमी पगारामुळे शिक्षक शाळांना सत्राच्या मध्यात सोडचिठ्ठी देत आहेत. या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे मोठय़ा प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असून या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमातील संबंधित विषय आपसूक कमजोर राहत आहेत. व्यवस्थापनाच्या कमी पगारात अधिक काम, या धोरणाला शिक्षक वाढलेल्या महागाईने रामराम ठोकत आहेत.
शैक्षणिक सत्राच्या शेवटी अनेक शाळांमध्ये शिक्षकांनी शाळांना सोडचिठ्ठी दिल्याचे अनेक प्रकरणे आहेत. काहींनी व्यवस्थापनाच्या जाचाला कंटाळून, तर काहींनी कमी पगाराचे कारण पुढे करून शाळेला रामराम केला. हा सर्वाधिक प्रकार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये मोठय़ा प्रमाणात होत आहे. या खाजगी शाळांचे शिक्षक असंघटीत असल्याने त्यांच्या शोषणाविरोधात कुणीच आवाज उठवित नाही. व्यवस्थापनाच्या विरोधात जाण्याचा कुण्या शिक्षकाने प्रयत्न केला तर नोकरी सोडावी लागते. शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणारे राजकीय नेते शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात आवाज उठवित नाही. त्यामुळे या शाळांचे शिक्षक अन्याय सहन न करता चुपचाप दुसरी नोकरी स्वीकारण्यास प्राधान्य देत आहेत.
या सर्व प्रकारात सर्वाधिक हाल हे विद्यार्थ्यांचे होत आहेत. सत्राच्या शेवटी पाठय़क्रम संपण्याच्या परिस्थितीत शिक्षकांनी सोडचिठ्ठी दिल्यावर त्याचा आपसूक परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणावर पडतो, असे चित्र येथील अनेक शाळांमधील आहे. याचा त्रास विद्यार्थ्यांबरोबर आता पालकांना होत आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याची वाटचाल यामुळे खडतर होत असल्याची जाणीव पालकांना होत आहे. शाळांमध्ये प्रवेश घेताना शाळांचे शिक्षकांविषयीच्या धोरणाची माहिती प्रत्येक पालकाने घेण्याची गरज आहे. तसे धोरण प्रत्येक खाजगी शाळांनी लेखी स्वरूपात सत्राच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या हितासाठी जाहीर करण्याची गरज आहे. हे जाहीर केलेले धोरण पुढील वर्षी किती टक्के कायम ठेवले, याचा तपशील पुढील सत्रात देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. या धोरणात व्यवस्थापनामार्फत शिक्षकांनी किती पगार दिला जातो, नियमानुसार शिक्षकांचे भविष्य निर्वाह निधी (पी.एफ.) देण्यात येतो का, शिक्षकांची शैक्षणिक अर्हता काय आहे, शाळांमधील शिक्षकांचे वास्तव्य किती दिवसांचे आहे, शाळांमधून शिक्षक सोडून जाण्याची संख्या किती आहे, शिक्षक शाळा सोडून जाण्याचे नेमके कारण काय, याचा तपशील पालकांनी प्रवेश घेण्यापूर्वी जमा करणे आवश्यक झाले आहे. शाळा व्यवस्थापन असा तपशील देत नसेल तर या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून वा त्यांच्या पालकांकडून शाळेबद्दलची माहिती जमा करण्याची गरज आता व्यक्त केली जात आहे.  यंदाच्या वर्षी अनेक पालकांना सत्राच्या शेवटी मुलांच्या अभ्यासातील अधोगती पाहिल्यावर या सर्व गोष्टींची जाणीव झाली. शिक्षकांनी अवेळी दिलेल्या सोडचिठ्ठीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे विषय कच्चे राहिले असून याचा फटका त्यांच्या भविष्यातील प्रगतीवर होणार आहे. याची चिंता आता पालकांनी व्यक्त करणे सुरू केले आहे. शाळांची शिक्षकांप्रती असलेली धरसोड वृत्ती विद्यार्थ्यांचे नुकसान करणारी आहे. त्यामुळे या पालकांनी व शिक्षकांनी संघटीतपणे लढा देण्याची गरज विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आवश्यक झाली आहे.